नवी दिल्ली : भारताच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. त्यांना श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही वर्षांपासून डॉ. मनमोहन सिंह हे प्रकृतीच्या कारणास्तव राजकारणापासून दूर होते. आता त्यांचे निधन झाले आहे. 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली.
Video : आठवड्यात 6 जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अपघात कधी थांबणार?, जिल्हाधिकारी Ayush Prasad Exclusive
अशी राहिली डॉ. मनमोहन सिंह यांची कारकीर्द –
डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील गाह या गावी झाला. 1947 साली फाळणीदरम्यान विस्थापित होऊन सिंह कुटुंब भारतात आले. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. डॉ. मनमोहन सिंह यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली.
सन 1966 ते 1969 या काळात मनमोहन सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं. नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले. 1972 ते 1976 या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं.
2004 ते 2014 देशाचे पंतप्रधान –
यूपीए सरकारने 2004 मध्ये बहुमत गाठल्यावर डॉ. मनमोहन सिंह हे पहिल्यांदा पंतप्रधान बनले. यानंतर 2008 साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली. मात्र, मनमोहन सिंहा यांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही. यानंतर 2009 मध्ये पुन्हा यूपीएची सत्ता आल्यावर मनमोहन सिंह यांना सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे.