चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 16 ऑगस्ट : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अगदी अडीच ते तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. राज्यात प्रत्येकवेळी काही लक्षवेधी मतदारसंघांची चर्चा नेहमीच होत असते. त्यातच आता या मतदारसंघांमध्ये आणखी एका विधानसभा मतदारसंघाची भर पडली आहे आणि तो मतदारसंघ म्हणजे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ. दरम्यान, या मतदारसंघात ऑटो-रिक्षांवर लागलेल्या बॅनरने लक्ष वेधलंय.
“आमच ठरलंय…आता आमदार अमोल भाऊचं” –
पाचोरा-भडगाव विधासभा निवडणूक प्रमुख तथा पाचोरा भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे हे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असून त्यासाठी त्यांनी जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. दरम्यान, पाचोरा-भडगावचे विद्यमान आमदार किशोर पाटील आणि अमोल शिंदे हे विविध विषयांवरुन एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अमोल शिंदेंनी यावेळीही विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. त्यासाठी त्यांनी तयारीही सुरू केल्याचे दिसत आहे. यातच आता पाचोरा भडगावमधील अनेक रिक्षांवर ‘आमचं ठरलंय..आता आमदार अमोल भाऊच’ असे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनरची सर्वत्र चर्चा होत आहे.
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ राजकीय परिस्थिती –
आमदार किशोर पाटील हे गेल्या दोन टर्मपासून पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र, आता आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली सुर्यंवशी तर भाजपचे अमोल शिंदे यांचे मोठे आव्हान आमदार किशोर पाटील यांच्यासमोर असणार आहे.
राज्यात महायुतीची सत्ता असल्याने तसेच पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात मागील दोन वेळेपासून याठिकाणी किशोर पाटील हेच आमदार असल्याने यावेळीही याठिकाणी हा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला येईल, असे बोलले जात आहे. त्यामुळे भाजप नेते अमोल शिंदे यांना तिकीट न मिळाल्यास ते पुन्हा अपक्ष निवडणूक लढू शकतात, अशी शक्यता आहे. त्यांनी तशी तयारीही केली असून ‘आमचं ठरलंय..आता आमदार अमोल भाऊच’ असे बॅनरही पाचोरा आणि भडगावमध्ये लक्ष वेधून घेत आहेत.
दरम्यान, आमदार किशोर पाटील यांना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या रुपाने कुटुंबातूनही आव्हान मिळाले आहे. तर त्यासोबतच भाजपचे नेते अमोल शिंदे यांचेही आव्हान आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नेमकं काय होतं, मतदार राजा कुणाला कौल देतो, याकडे फक्त तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे, राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Unmesh Patil Interview : ‘एकतर नार-पार नाहीतर हद्दपार…’, उन्मेश पाटील यांची Exclusive मुलाखत