चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 13 जून : आमदार किशोर पाटील यांनी स्मिता वाघ यांच्या विजयानिमित्त आयोजित केलेल्या आभार मेळाव्यात विधानसभा निवडणुकीसाठी 100 दिवस शिल्लक असून कामाला लागा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. यावरून भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी टीका केलीय. 100 टक्के त्यांचे शेवटचे दिवस शिल्लक राहिलेले असून इथला शेतकरी त्यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले आहेत.
अमोल शिंदे यांची आमदार पाटील यांच्यावर टीका –
पाचोरा येथील आज भाजप कार्यालयात अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. ज्या लोकप्रतिनिधींना संबंधित शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे येऊन कामे करता येत नसेल तर पुढच्या काळात यांना या पदावर राहण्याचा अधिकार येथील जनता त्यांना देणार नाही, असे अमोल शिंदे यावेळी म्हणाले. दरम्यान, जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांच्या मुद्यांवरूनही अमोल शिंदे यांनी नाव न घेता आमदार किशोर पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
अखेर, जिल्हा बँकेचा ‘तो’ निर्णय मागे –
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जळगाव जिल्ह्यात रहिवास असणाऱ्या मात्र जिल्हा हद्दीबाहेर शेजारील जिल्ह्यात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येऊ नये.अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत जिल्हा बँकेच्या संबंधित निर्णय मागे घेण्यासाठी निवदेनाच्या माध्यमातून माहिती दिली. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांसोबत संपर्क करत सूचना देऊन हा निर्णय मागे घेण्यास सांगितल्याची माहिती अमोल शिंदे यांनी दिली.
काय होता जिल्हा बँकेचा निर्णय –
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जळगाव जिल्ह्यात रहिवास असणाऱ्या मात्र जिल्हा हद्दीबाहेर शेजारील जिल्ह्यात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येऊ नये, अशा पद्धतीचा निर्णय घेतला जिल्हा बँकेने घेतला होता. यामध्ये पिंपळगाव हरे.,वरसाडे तांडा, सातगाव डोंगरी,वडगाव कडे,अटलगव्हाण,शिंदाड,सार्वे, पिंप्री,खडकदेवळा,चिंचखेडा बु. डोंगरगाव,नगरदेवळा,सिम निपाने,बदरखे,दिघी व इतर काही अशी गावे आहेत. ज्यांच्या सीमा शेजारील जिल्हा असणाऱ्या छ.संभाजीनगर जिल्ह्याला लागून असल्याने येथील गावातील काही रहिवाश्यांच्या शेतजमिनी या छ.संभाजीनगर जिल्ह्याच्या हद्दीत येतात.
मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातुन सोडवला मुद्दा –
जळगाव जिल्हा बँकेच्या या निर्णयामुळे सदर शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार नाही व शेतकरी बांधवांना शेतीसाठी आवश्यक बी-बियाणे, रासायनिक खते व इतर शेतीसाठी लागणारी साधने खरेदी करणे शक्य होणार नाही आणि सदर शेतकरी जिल्हा बँकेतून मिळणाऱ्या या पिक कर्ज योजनेपासून वंचित राहून आर्थिक संकटात सापडतील, असे निवेदनाच्या माध्यमातून अमोल शिंदे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मांडून निर्णय मागे घेण्याची मागणी केली.
पत्रकार परिषदेत यांची होती उपस्थिती –
अमोल शिंदे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील पंचायत समितीचे माजी सभापती व तालुका सरचिटणीस बन्सीलाल पाटील,शहराध्यक्ष दीपक माने, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील,समाधान मुळे,मुकेश पाटील, जगदीश पाटील,किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष विजय महाजन,योगेश ठाकूर,रोहन मिश्रा,अमोल नाथ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : Smita Wagh Special Interview : आपल्या मुलांसाठी मतदारसंघाला कर्मभूमी बनवणार – खासदार स्मिता वाघ