ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 11 ऑक्टोबर : खरीप हंगाम 2023-24 मधील कापूस, मक्का, उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तुर इत्यादी पिकांचा उत्पन्नावर आधारित (Yield based) पिक विमा मंजूर करण्यासाठी भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून पाचोरा तालुक्यातील 46 हजार 116 शेतकऱ्यांना अंदाजे 93 कोटी 58 लाख रुपये व भडगाव तालुक्यातील 23 हजार 771 शेतकऱ्यांना 11 कोटी 84 लाख रुपये अशी अंदाजे एकूण 105 कोटीची नुकसान भरपाई मंजूर करून घेतली होती. परंतु सदर नुकसान भरपाई मंजूर होऊन देखील बऱ्याच महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास विलंब होत होता.
या संदर्भात दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांच्या प्रतिनिधीशी संपर्क केला असता. शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नसल्याने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई बँक खात्यात जमा करण्यात आलेले नसल्याची माहिती मिळाली. आणि अमोल शिंदे यांनी पुन्हा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे सदर शेतकऱ्यांच्या समस्येचा तगादा लावून ठेवला आणि शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला.
दरम्यान, या पाठपुराला अखेर यश आले आणि शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात आता झाली आहे. ऐन दसऱ्याच्या तोंडावर मिळालेल्या मदतीमुळे शेतकऱ्यांचा दसरा नक्कीच गोड होणार असून पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून अमोल शिंदे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले जात असून आभार देखील व्यक्त होत आहेत.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. विजयश्री मुठे यांची विशेष मुलाखत