नागपूर, 15 डिसेंबर : राज्यातील महायुती सरकारचा मंत्रीमंडळाचा विस्तार आज दुपारी नागपुरात होणार आहे. त्याआधी मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांना महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांकडून फोन केला जात आहे. असे असताना भाजप नेते गिरीश महाजन यांना मंत्रीपदाचा फोन आला आहे. दरम्यान, फोन आल्यानंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांसोबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
गिरीश महाजन काय म्हणाले? –
गिरीश महाजन माध्यमांसोबत संवाद साधताना म्हणाले की, नागपूरला लँड होण्यापुर्वीच विमानात असताना मला आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला. आज दुपारी चार वाजता मंत्रीपदाची शपथ घ्यायची आहे, असे त्यामध्ये सांगण्यात आले. तिसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेणार असून हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. यासाठी दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंतच्या सर्व भाजपच्या नेतृत्वाचे आभार मानतो.
नव्या नेतृत्वाला संधी –
गिरीश महाजन पुढे म्हणाले की, नवीन पिढी पुढे आली पाहिजे. यासाठी महायुती सरकारमध्ये नवीन चेहऱ्यांना देखील संधी देण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतलाय. पाच वर्ष आम्ही पुर्ण बहुमताने सत्तेत आहोत. यासाठी पुर्ण ताकदीने आम्हाला काम करायचंय. दरम्यान, ज्यांना मंत्रीपद दिलेले नाहीये, पक्षातील वरिष्ठ नेतृत्व त्यांची समजूत काढणार आहे. खरंतर, काही तरुण नेतृत्व आणि काही जेष्ठ असे सर्वांनी मिळून हे मंत्रीमंडळ असणार आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.
तिसऱ्यांदा घेणार मंत्रीपदाची शपथ –
गिरीश महाजन यांनी जामनेर विधानसभा मतदारसंघांचे आतापर्यंत तब्बल सहा वेळा प्रतिनिधित्व केले असून सलग सातव्यांदा ते निवडून आले आहेत. असे असताना महाजन आता तिसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भाजपमध्ये त्यांना विशिष्ट स्थान असून संकटमोचक अशी त्यांची ओळख आहे. दरम्यान, नव्या मंत्रीमंडळात त्यांनी शपथ घेतल्यानंतर महाजन यांना नेमकं कोणतं खातं मिळणार याकडेही लक्ष लागले आहे.