सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 31 जुलै : महसूल विभागाकडून दरवर्षी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचे आयोजन केले जाते. यात या वर्षी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बदल करून महसूल पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत महसूल पंधरवडा साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पारोळा तहसील कार्यालयात आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
पारोळा तहसील कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन –
पारोळा तहसील कार्यालयात दरवर्षी महसूल दिनानिमित्त विविध उपक्रम राबवले जात असतात. त्याच अनुषंगाने आज 31 जुलै रोजी महसूल विभागाने सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिर आयोजित केले. यात 42 दात्यांनी रक्तदान केले. यावेळी उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, नायब तहसीलदार अनिल पाटील, एस पी पाटील तसेच तालुक्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, अव्वल कारकून आदी उपस्थित होते. या शिबिराची संकल्पना श्री निशिकांत पाटील यांनी मांडली
महसूल पंधरवाड्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन –
महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची नागरिकांना अधिक माहिती मिळावी आणि त्यांची कामे जलद आणि सोपी व्हावी यासाठी महसूल सप्ताह 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट राबविला जाणार आहे. या पंधरवड्यात विविध उपक्रम राबविले जाणार असून नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करून महसूल सप्ताहाचा प्रारंभ केला जाणार आहे.
हेही वाचा : Big Breaking : वादग्रस्त महिला अधिकारी पूजा खेडकर यांचे IAS पद रद्द, UPSC ने केली मोठी कारवाई