पहलगाम (काश्मीर) : काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्यात किमान 28 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाले.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान 28 जणांचा मृत्यू झाला असून किमान 10 पर्यटक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी बैसरन येथे पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वेशात येऊन पर्यटकांना नाव विचारत त्यांच्यावर गोळ्या घातल्या. दरम्यान, या घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू झालाय. तर दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट द्वारे माहिती देताना सांगितले की, पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत.
दरम्यान, स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा : UPSC 2024 मध्ये महाराष्ट्राचा डंका, पुण्याच्या अर्चित डोंगरेने पटकावला देशात तिसरा क्रमांक