ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 16 नोव्हेंबर : पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारासाठी भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीसाठी प्रसिद्ध अभिनेते गोविंदा आज पाचोऱ्यात आले होते. दरम्यान, आरोग्याच्या कारणाने ते रोड शो अर्धवट सोडून पाचोऱ्यातून मुंबईला रवाना झाले.
पाचोऱ्यात गोविंदा यांचे जल्लोषात स्वागत –
पाचोरा शहरात महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अभिनेता गोविंदा हे पाचोर्यात दाखल झाले होते. हेलीपॅड वर डॉ.प्रियंका पाटील व महिला आघाडीच्या वतीने त्यांचे औक्षण करत आमदार किशोर आप्पा पाटील व शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. पाचोरा व भडगाव शहरात त्यांच्या भव्य रोड शो चे आयोजन करण्यात आले होते.
रोड शो अर्धवट सोडून पाचोऱ्यातून मुंबईला रवाना –
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या रॅलीसाठी अभिनेता गोविंदा यांचे एसएसएमएम महाविद्यालयाच्या मैदानावर हॅलीकॉप्टरने आगमन झाले. यानंतर अभिनेता गोविंदा व आमदार किशोर आप्पा पाटील यांनी एकत्रित ओपन जीपमध्ये एकत्र येत एम एम महाविद्यालयाच्या प्रांगणापासून शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत नागरिकांना अभिवादन करत रोड शोला सुरुवात केली. मात्र, अचानक त्यांना छातीत वेदना होऊन अस्वस्थपणा जाणवू लागल्याने रोड शो थांबवत ते पुन्हा हेलीपॅड करणे रवाना झाले. तेथून त्यांनी मुंबईकडे प्रयाण केले.
मुंबईकडे रवाना होत असताना गोविंदा काय म्हणाले? –
रोड शो अर्धवट सोडून पाचोऱ्यातून मुंबईला रवाना होत असताना माध्यमांसोबत बोलताना गोविंदा म्हणाले की, मी येथील जनतेची माफी मागतो की, त्यांनी एवढ्या प्रेमाने माझी प्रतिक्षा केली. मात्र, माझी तब्येत ठीक नसल्याने मी तातडीने मुंबईकडे रवाना होत आहे. दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देण्याचे आवाहन, गोविंदा यांनी यावेळी केली.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
अभिनेता गोविंदा हे अर्धवट दौऱ्यातून परतल्यानंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी देखील माहिती दिली की, गोविंदा यांची पाचोऱ्यात येण्याआधी बोदवड आणि मुक्ताईनगरात रॅली पार पडली. या रॅली दरम्यान त्यांना आधी ज्या पायाला गोळी लागली होती त्याठिकाणी त्यांना इजा झाली. असे असताना गोविंदा जळगाव विमानतळावरूनच मुंबईला रवाना होणार होते. मात्र, पाचोऱ्यातील जनतेसाठी ते याठिकाणी आले.
पाचोऱ्यात ते आल्यानंतर कॉलेजपासून ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत त्यांची रॅली निघाली. खरंतर, त्यांची तब्येत बरी नसताही ते पाचोऱ्यात आले आणि जतनेला अभिवादन केले तसेच मला शुभेच्छा देऊन गेले, यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो. दरम्यान, पाचोरा शहरातील त्यांचा राहिलेला अर्धवट रोड शो व भडगाव एरंडोल चोपडा मतदारसंघाचे रोडशो रद्द करण्यात आल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.
पाचोऱ्यात गोविंदाच्या रॅलीला मोठा प्रतिसाद –
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या रॅलीसाठी अभिनेते गोविंदा येणार असल्याने मतदारसंघातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. एसएसएमएम महाविद्यालयाच्या प्रांगणाच्या सभोवताली अभिनेता गोविंदा व आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या चाहत्यांनी गराडा घालत मोठी गर्दी केली होती. रॅलीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून देखील योग्य ती खबरदारी घेण्यात आली.
हेही वाचा : भडगाव : 102 वर्षांच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क, मतदानानंतर सोडले प्राण