मुंबई, 4 सप्टेंबर : धक्का देणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीआधी महाविकास आघाडीला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
नेमका गुन्हा दाखल का झाला? –
भाजप नेते तथा विद्यमान ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर आहे. पोलीस अधिकारी प्रवीण मुंढे यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात याबाबत जबाब दिला होता. दरम्यान, याप्रकरणी सीबीआयने आता अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याआधी या गुन्ह्यात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण तसेच इतर आरोपी होते.
मुंढे यांनी नेमका काय दिला होता जबाब? –
महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात एक प्रकरणी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी पण हा गुन्हा जळगावात दाखल व्हावा यासाठी अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांनी तत्कालीन जळगावचे एसपी प्रवीण मुंढे यांना सातत्याने फोन केला होता. अनिल देशमुख यांनी गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करावा, यासाठी एसपींवर दबाव टाकला होता, असा जबाब स्वत: जळगावाचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी सीबीआयकडे दिला होता.
अनिल देशमुखांच्या अडचणी पुन्हा वाढणार –
माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) जेष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर गृहमंत्री असताना त्यांनी 100 कोटी रूपये वसुलीचे पोलीस आयुक्तांना टार्गेट दिल्याच्या आरोपाखाली ईडीने अटक केली होती. जवळपास 14 महिने ते तुरूंगात होते. यानंतर त्यांची डिसेंबर 2022 साली त्यांची आर्थर रोड तरूंगातून सुटका झाली. यानंतर आता पुन्हा एकदा सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने अनिल देशमुखांच्या अडचणी पुन्हा वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : Video : “…..तर महाराजांचा पुतळा कोसळला नसता,” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठ विधान