मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 28 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या चोपडा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चोपडा मतदारसंघासाठी राजू तडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, आज त्याठिकाणी उमेदवार बदलत ठाकरे गटाने प्रभाकर सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, आता शिंदे गटाकडून चंद्रकांत सोनवणे तर ठाकरे गटाकडून प्रभाकर सोनवणे अशी लढत रंगणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाने चोपड्याचा उमेदवार बदलला –
चोपडा विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव असून शिवसेनेच्या लता सोनवणे ह्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. याठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी आधी राजू तडवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, चोपड्यातला उमेदवार बदलला असून राजू तडवी यांच्याऐवजी प्रभाकर गोटू सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच त्यांना मातोश्रीवरून एबी फॉर्मचे देखील वाटप करण्यात आले आहे.
दोघेही उमेदवार उद्या अर्ज करणार दाखल –
चोपडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून आता प्रभाकर गोटू सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांना मातोश्रीवरून एबी फॉर्म मिळाल्यामुळे उद्या ते चोपड्यात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून चंद्रकांत सोनवणे हे देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. असे असताना शिवसेना शिंदे गटाकडून चंद्रकांत सोनवणे तर ठाकरे गटाकडून प्रभाकर सोनवणे हे एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने चोपड्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : MLA Kishor Appa Interview : तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर विरोधकांवर जोरदार हल्लाबोल