पुणे, 6 जानेवारी : पुण्यातील ससून रूग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भाजप आमदार सुनील कांबळे यांनी पोलिस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली होती. दरम्यान, हे प्रकरण त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण? –
उपमुख्यामंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल पुण्यातील ससून रुग्णालय बी जे मेडिकल कॉलेजमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता. दरम्यान, कार्यक्रम संपल्यानंतर पोलीस कर्मचारी शिवाजी सरक हे त्यांचे कर्तव्य बजावत असताना आमदार सुनील कांबळे यांनी सरक यांच्या कानशिलात लगावली होती. सोशल मीडियावर या मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
आमदारांविरोधात गुन्हा दाखल –
पुणे छावणी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुनील कांबळे यांनी पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी सरके यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाणीचं नेमकं कारण काय? –
पुण्यात ससून रूग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्डचे उद्घाटन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र, कार्यक्रम पत्रिकेत आपले नाव छापले नाही म्हणून आमदार कांबळे संतापले आणि अजित पवार गटाचे वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र सातव यांना आमदार कांबळे यांनी कानशिलात लगावली. त्यानंतर कार्यक्रम संपल्यावर स्टेजवरून खाली उतरत असताना पोलिस कर्मचारी सरक यांच्याही कानशिलात कांबळेंनी आवाज काढला.
आमदार कांबळे काय म्हणाले? –
आमदार सुनील कांबळे याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “मी कार्यक्रमातून बाहेर पडलो. सकाळी लवकर उठल्यामुळे नाश्ता झालेला नव्हता तसेच गोळ्या घ्यायच्या होत्या त्यामुळे घाईगडबडीत बाहेर पडलो. कार्यालयात आल्यावर मला माहिती पडले की, हे सगळे लाईव्ह सुरू झालेले आहे. काय झाले हेच मला कळाले नाही, मी कोणालाच मारहाण करण्याचा संबंधच नाही. तो कोण व्यक्ती आहे, मी त्याला ओळखत नाही, मी का मारू त्याला?”, असेही ते म्हणाले आहेत.