ठाणे, 28 ऑगस्ट : महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक (डीजी) संजय पांडे यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आलीय. संजय पांडे यांच्यासह आणि अन्य सहा जणांविरुद्ध जबरदस्ती आणि बेकायदेशीर कृत्य या आरोपांवरून ठाणे नगर पोलिस ठाण्यात काल गुन्हा करण्यात आलाय. मुंबईतील व्यावसायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची माहिती ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिलीय.
नेमकं काय प्रकरण? –
व्यावसायिक संजय पुनामिया यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलंय की, मे 2021 ते 30 जून 2024 या कालावधीत यातील कथित आरोपींकडून आपण त्रास सहन केला. या तक्रारीमध्ये पांडे, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त सरदार पाटील, पोलिस निरीक्षक मनोहर पाटील तसेच श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल व शरद अग्रवाल यांचा समावेश आहे.
तक्रारदाराच्या दाव्यानुसार, आरोपींनी ठाणे नगर पोलिसांकडे 2016 मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्याचा बेकायदेशीर तपास केला. तक्रारदार आणि इतर व्यावसायिकांना खोट्या केस दाखल करण्याच्या धमक्या दिल्या आणि पैसे उकळले तसेच विशेष सरकारी वकील म्हणून खोटे दस्तवेज तयार करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
याबाबतची तक्रार ठाणे नगर पोलिस ठाण्यात सोमवार, 26 ऑगस्ट 2024 रोजी ई-मेलद्वारे पुनामिया यांनी दाखल केली. 166 (अ) आणि 170 (शासकीय कर्मचाऱ्यांची गैरवर्तणूक आणि खोटे रूप धारण), 120 बी (फौजदारी कट), 193 (खोट्या पुराव्यांची निर्मिती), 195,199, 199, 203, 205 आणि 209 (खोटे विधान आणि न्यायालयाच्या कार्यात अडथळा), 352 आणि 355 (हल्ला), 384 आणि 389 (जबरदस्ती), 465, 466, आणि 471 (खोट्या दस्तऐवजांची निर्मिती आणि वापर) आदी कलमांचा समावेश आहे.
हेही वाचा : “…हिशोब चुकता करीन म्हटलं की करीन हा माझा शब्द,” मनोज जरांगे यांचा नेमका रोख कुणाकडे?