किनगाव (यावल), 25 फेब्रुवारी : राज्यात एकीकडे सरकारकडून कॉपीमुक्त अभियानासाठी उपाययोजना केल्या जात असताना यावल तालुक्यातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावल तालुक्यातील किनगाव येथील परीक्षा केंद्राबाहेर दहावी मराठी द्वितीय पेपरसाठी शिक्षकांनीच कॉपी केल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी मुख्याध्यापिकेसह दोन शिक्षकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी बातमी काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव येथील नेहरू माध्यमिक विद्यालय केंद्रावर शाळेच्या बाहेर रिक्षामध्ये वरील तीनही जण कॉपी पुरवण्याच्या उद्देशाने प्रश्न संचातून प्रश्नोत्तरे पाहून कॉपी तयार करीत होते. दरम्यान, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच संबंधित शिक्षकांविरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.
याप्रकरणी प्रभारी गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी यावल पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल स्कूलच्या मुख्याध्यापिका शीला तायडे, अमोल भालेराव व आशा युसुफ पटेल (रा. यावल) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.