बीड, 18 एप्रिल : बीड जिल्हा हा गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमुळे नेहमीच चर्चेत राहिला असताना आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात वकील महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर महिलेला डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याने तिने त्याची तक्रार केल्याने गावतील सरपंचाने त्याच्या कार्यकर्त्यांसोबत मिळून बेदम मारहाण केली. दरम्यान, या मारहाणीत महिला वकील जबर जखमी झाल्या असून सरपंचासह दहा जणांविरोधात युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे संपुर्ण प्रकरण? –
मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई तालुक्यात असलेल्या सनगाव येथील महिला वकील ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान ह्या अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकीली करतात. त्यांना ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने लाऊड स्पीकर लावू नयेत व घरापुढे पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत त्यांनी तक्रारी केल्या होत्या. तसेच ज्ञानेश्वरी अंजान हिच्या आईची कोर्टात सुरू असलेली 307ची केस काढून घेण्यामुळेही वाद निर्माण झाले.
दरम्यान, 14 एप्रिल रोजी ज्ञानेश्वरी अंजान या वकील महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी पाईपने प्रचंड मारले. याबाबतचे फोटो सर्वप्रथम राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत घटनेबाबत माहिती दिली. त्या महिलेच्या अंगातील रक्त साकळल्याचे तसेच त्यांच्या पाठीवर काळे-निळे वळ उठल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेल्या फोटोंमधून दिसून येते.
सरपंचासह 10 जणांविरोधात गुन्हे दाखल –
बीडमधील महिला वकिलाला मारहाण करण्यात आल्याचे प्रकरण समोर येताच सरकारविरोधात विरोधकांवर मोठ्या प्रमाणात निशाणा साधण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील मोठी कारवाई करत सरपंचासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. यामध्ये सरपंच अनंत रघुनाथ अंजान यांच्यासह सुधाकर रघुनाथ अंजान, राजकुमार ज्ञानोबा मुंडे, कृष्णा ज्ञानोबा मुंडे, ज्ञानोबा बब्रुवान रपकाळ, नवनाथ ज्ञानोबा जाधव, मृत्युंजय पांडुरंग अंजान, अंकुश बाबुराव अंजान, सुधीर राजाभाऊ मुंडे, नवनाथ दगडू मोरे या दहा जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास युसुफ वडगाव पोलीस करत आहेत.
हेही वाचा : “एन्काऊंटरची चर्चा बंद दाराआड…10 लाख रूपये मला पाठवले”, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंच्या आरोपांनी खळबळ