नागपूर, 13 एप्रिल : तरुण आयपीएस अधिकाऱ्यावर डॉक्टर तरुणीने बलात्काराचा आरोप केल्याने त्याच्याविरोधात नागपुरातील इमामवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दर्शन दुगड (वय 30 रा. यवतमाळ) असे त्या तरूण आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे. सध्या ते नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे पोलीस उपधीक्षक पदावर कार्यरत असल्याचे समजते. लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप पीडित डॉक्टर तरूणीने त्या आयपीएस अधिकाऱ्यावर केले आहेत.
नेमकं प्रकरण काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, दर्शन दुगडची 2022 साली एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. त्यानंतर त्या दोघांची नियमित चॅटिंग होत असल्याने ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर या तरूणीला केरळ येथ फिरायला घेऊन जात तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी आयपीएस अधिकारी दर्शनने केली. दरम्यान, युवतीने नकार दिल्यानंतर त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
‘…आयपीएस म्हणून रूजू झाला अन् लग्नास दिला नकार’ –
यासोबतच नागपुरातील इमामवाडा परिसरातील एका लॉजमध्ये देखील तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच 2022 ते 2025 या कालवाधीत या आयपीएएस अधिकाऱ्याने वेळोवेळी सदर तरूणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, दर्शन आयपीएस अधिकारी म्हणून रूजू झाल्यानंतर लग्नाची मागणी करणाऱ्या तरूणीला शिवीगाळ करत लग्नास नकार दिला.
दरम्यान, आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच संबंधित डॉक्टर तरूणीने इमामवाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. इमामवाडा पोलिसांनी दर्शन दुगडविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. दरम्यान, या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अजनीचे सहायक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
वयाच्या 25 व्या वर्षी आयपीएस अधिकारी –
दर्शन दुगड हा मुळचा यवतमाळ जिल्ह्यातील असून त्याने वयाच्या 25 व्या वर्षी यूपीएससीतून यश मिळवलं आहे. त्याने हे यश दुसऱ्या प्रयत्नामध्ये मिळवलं असून देशात 138 वा क्रमांक पटकावला होता. दरम्यान, दर्शन सध्या नंदुरबारमधील अक्कलकुवा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मात्र, आता त्याच्यावर डॉक्टर तरूणीने बलात्काराचे आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
हेही पाहा : ‘जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी’, जळगावचे SP डॉ. महेश्वर रेड्डी नेमकं काय म्हणाले?