नवी दिल्ली, 1 एप्रिल: देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय उपक्रमांपैकी एक असलेली जनगणना प्रक्रिया आज, 1 एप्रिलपासून सुरू होत आहे. तब्बल 15 वर्षांनंतर ही जनगणना होत असून यावेळी ती पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. ही प्रक्रिया दोन टप्प्यांत राबवली जाणार आहे.
15 वर्षांनंतर जनगणना करण्यास सुरूवात –
पहिल्या टप्प्यात घरगुती व गृहनिर्माण संबंधित माहिती संकलित केली जाईल. 1 एप्रिलपासून नागरिकांना स्वयं-नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर 16 एप्रिलपासून अधिकारी प्रत्यक्ष घराघरात जाऊन माहिती गोळा करतील. या टप्प्यात घराची स्थिती, पाणी, वीज, स्वच्छता तसेच मालमत्तेसंबंधी तपशील नोंदवला जाणार आहे.
दोन टप्प्यांत पार पडणार जणगणना –
जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे. यात वय, शिक्षण, व्यवसाय, स्थलांतर यांसह जातीनिहाय तपशीलही नोंदवला जाईल. एप्रिल ते सप्टेंबर 2026 या कालावधीत पहिला टप्पा पार पडणार असून, देशातील 36 राज्ये व केंद्रशासित प्रदेश तसेच 6.3 लाखांहून अधिक गावांचा यात समावेश असेल. यासोबतच, लीव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना विवाहित म्हणून गणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आल्याची माहिती आहे.
संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने –
जनगणनेसाठी एकूण 33 प्रश्न निच्छित करण्यात आले असून कुटुंबप्रमुख या प्रश्नांची उत्तरे गणकाला देतील. गणक ही माहिती सुरक्षितपणे संग्रहित करेल आणि ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण केली जाईल. यासोबतच, कुटुंबप्रमुखाची माहिती ऑनलाइन देखील गोळा केली जाणार असल्याची माहिती समो आली आहे.
जनगणनेतून मिळणारी माहिती ही शासनाच्या धोरणनिर्मितीसाठी आणि प्रभावी सार्वजनिक प्रशासनासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांची फेररचना आणि आरक्षण निश्चित करण्यासाठी या आकडेवारीचा वापर केला जातो. याशिवाय, संशोधक आणि अभ्यासकांनाही या माहितीचा मोठा फायदा होतो.






