नवी दिल्ली, 4 मार्च: मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला असून, इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने जगातील अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग मानली जाणारी होर्मुझ सामुद्रधुनी सर्व जहाजांसाठी बंद केल्याची घोषणा केली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या कोणत्याही जहाजावर कारवाई केली जाईल, असा कठोर इशारा इराणकडून देण्यात आला आहे.
या निर्णयामुळे जागतिक स्तरावर तेलपुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे चिंतेचे वातावरण असले तरी भारत सरकारने देशातील इंधनपुरवठा सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.
भारताकडे 25 दिवसांचा इंधन साठा शिल्लक –
इराण–इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सांगितले की, देशात सध्या कच्चे तेल आणि शुद्ध इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. उपलब्ध माहितीनुसार, सुमारे २५ दिवस पुरेल इतका तत्काळ साठा उपलब्ध असून एकूण मिळून आठ आठवड्यांचा कच्च्या तेल व पेट्रोलियम उत्पादनांचा साठा देशात आहे.
गेल्या काही वर्षांत भारताने तेल आयातीचे स्रोत विविध देशांमध्ये विस्तारले आहेत. विशेषतः रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची आयात वाढवण्यात आली आहे. त्यामुळे भारताचा मोठा पुरवठा आता होर्मुझ मार्गावर पूर्णपणे अवलंबून राहिलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ होत असली तरी देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तातडीने वाढवण्याची कोणतीही योजना नसल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
विशेष नियंत्रण कक्ष स्थापन –
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सांगितले की, सरकार परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. मंत्रालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून देशातील इंधनसाठ्याचा दर तासाला आढावा घेतला जात आहे. ग्राहकांचे हित जपणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक बाजारात तेलदरांची उसळी –
युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वाढ नोंदवली गेली. आंतरराष्ट्रीय मानक असलेले Brent Crude हे प्रति बॅरल ७९.४४ डॉलर्सवर पोहोचले, तर सोमवारी त्याने ८२.३७ डॉलर्सचा टप्पाही ओलांडला होता. या घडामोडींमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






