चाळीसगाव, 21 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार राजीवदादा देशमुख यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.
2009 च्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. काही कालावधीपूर्वीच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. आज राजीव दादा देशमुख यांच्या निधनानंतर संपूर्ण जिल्ह्यातून शोक व्यक्त केला जात आहे.
माजी आमदार राजीवदादा देशमुख यांचा परिचय –
दिवंगत नगराध्यक्ष रामरावदादा यांच्या निधनानंतर नगराध्यक्षपदाची जबाबदारी त्यांचे पुत्र अनिलदादा यांच्याकडे जनतेने सोपविली. त्यांनी तब्बल 27 वर्षे नगराध्यक्षपद भूषववले आणि महाराष्ट्रात नावलौकीक मिळविला होता. दरम्यान, अनिलदादा देशमुख यांचे 2001 मध्ये निधन झाले, त्यानंतर नगरसेवक म्हणून त्यांचे पुत्र राजीव दादा देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. त्यावेळी ते राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. राजीव दादा देशमुख यांच्या सार्वजनिक, सामाजिक व राजकीय जीवनाची सुरुवात येथून झाली. तेव्हापासून त्यांनी आपल्या संघटन कौशल्याची चुणूक दाखविली.
यानंतर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीतही ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले तर नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत त्यांच्या पत्नी पद्मजा देशमुख विजयी झाल्यात आणि पालिकेची सत्ता देशमुख परिवाराकडे आली.
चाळीसगाव विधानसभा मतदार संघ 40 वर्षानंतर प्रथमच खुला झाल्यानंतर राजीव देशमुख यांना आमदारकीची संधी मिळाली. आमदारकीच्या या संधीने स्व. अनिल दादांची इच्छा पूर्ण झाली. आजोबा स्व. रामरावदादा व वडील स्व. अनिलदादा यांच्या पावलावर पाऊल ठेवीत राजीव देशमुख यांनीही राजकारणाबरोबरच सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक रुची जोपासली.
वडील व आजोबांनी जोपासलेला वारसा ते मोठ्या दिमाखाने त्यांनी पुढे नेला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तरीही त्यांनी निष्ठेने जनसेवा केली. आपल्या समाजजीवनात त्यांनी कुटूंबाचे समाजकारण, राजकारणातील कामांची पध्दत त्याच दिशेने त्यांनी पुढे आणली. मैत्री पूर्ण वृत्ती, हसतमुख चेहरा, सदैव सहकार्याची तयारी, सर्वांशी आदर व आपुलकीची वागणूक ही त्यांची बलस्थाने होती.
आमदारकीच्या काळात त्यांनी चाळीसगाव एमआयडीसीची मुहूर्तमेढ रोवली. गिरणा धरणातून चाळीसगाव शहराला पाणी पुरवठा करणारी योजना मंजूर करुन ती कार्यान्वीत केली. वरखेडे धरणाची सुरुवात ही त्यांच्याच काळात झाली. अशा पद्धताने जिद्दीने आपला राजकीय व सामाजिक प्रवास सुरु ठेवणारे राजीवदादा देशमुख यांच्या निधनाने तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्वच स्तरातून त्यांना श्रद्धांजली अर्पित केली जात आहे.






