रिंगणगाव (एरंडोल), 14 मार्च: ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी महसूल व वन विभागाच्या १८ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव मंडळातील आज शनिवार 14 मार्च रोजी भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी आवश्यक असलेले दाखले वितरित करण्यात आले. त्यामध्ये जात प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र आणि उत्पन्न प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. सुलभ शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 7/12 उताऱ्यावरील ‘तुकडा’ हा शेरा कमी करून दुरुस्ती करण्यात आली व शेतकऱ्यांना दुरुस्त उतारे देण्यात आले.
शिबिराच्या ठिकाणी विविध प्रशासकीय विभागांचे माहितीपर प्रदर्शनीय टेबल लावण्यात आलेले होते. या शिबिरात विविध विभागांच्या माध्यमातून अनेक सेवा देण्यात आल्या. त्यामध्ये नवीन रेशन कार्ड, वारस फेरफार, कालबाह्य नोंदी कमी, आयुष्मान भारत कार्ड, घरकुल लाभार्थी नमुना ८ – ३० अशा सेवांचा समावेश आहे. कृषी विभागाच्या विविध योजना तसेच घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, ॲग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी यांसारख्या सेवाही नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.

एरंडोलचे तहसीलदार गोपाळ पाटील, रिंगणगाव भाग नोडल ऑफिसर नायब तहसीलदार दिलीप पाटील, तसेच विविध तालुका स्तरीय शासकीय अधिकारी, रिंगणगाव मं.अ. संजय साळुंके व रिंगणगाव ग्रा.म.अ. वैभव पाठे तसेच व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंडळ परिसरातील 300 ते 350 नागरिकांनी येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत विविध सेवा योजनांचा लाभ घेतला.






