जळगाव, 20 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखालील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल 13 मे रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला होता.
दहावीच्या गुणपत्रांचे 26 मे रोजी होणार वाटप –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांचे गुणपत्रक आणि तपशीलवार गुणदर्शिका शालेय अभिलेखांसह विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना सोमवारी, दिनांक 26 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता वितरित करण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमार्फत गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे.
याबाबत विभागीय मंडळांनी सर्व माध्यमिक शाळांना सूचना दिल्या असून, संबंधित मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्याचा दहावीच्या परिक्षेचा निकाल हा 94.10 टक्के –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा निकाल हा 94.10 टक्के इतका लागला असून यामध्ये यंदाही मुलींनी बाजी मारलीय. तसेच यंदा कोकण विभाग अव्वल ठरलाय तर नागपुर विभागाचा निकाल सर्वाधिक कमी टक्केवारीचा आहे.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी –
- कोकण : 99.82 टक्के
- कोल्हापूर : 96.78 टक्के
- मुंबई : 95.84 टक्के
- पुणे : 94.81 टक्के
- नाशिक : 93.04 टक्के
- अमरावती : 92.95 टक्के
- संभाजीनगर : 92.82 टक्के
- लातूर : 92.77 टक्के
- नागपूर : 90.78 टक्के