चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 14 ऑगस्ट : “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेबरोबर राज्यातील विकास कामांना खीळ न बसू देता ते अविरतपणे चालू ठेवण्यात येतील. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात केले.
शंभर कोटींच्या निधीची घोषणा –
जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी शंभर कोटी रुपये देण्यात येतील. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसीत युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवीन उद्योग आणण्यात येतील. अमळनेर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मेळावा –
सागर पार्क मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मेळावा आज संपन्न झाला. महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. धरणगाव बालकवी स्मारकाचे ई- भूमिपूजन यावेळी संपन्न झाले.
याप्रसंगी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते सामुदायिक निधी अंतर्गत सावित्रीबाई फुले प्रभातसंघ, झेप महिला प्रभात संघ,स्त्री शक्ती महिला प्रभात संघ या महिला बचतगटांना प्रत्येकी 24 लाख 60 हजार रूपयांच्या अनुदानाचा धनादेशांचे वितरण करण्यात आले.
यांची होती उपस्थिती –
या महिला सक्षमीकरण मेळाव्यास व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार सर्वश्री चिमणराव पाटील, सुरेश भोळे, संजय सावकारे, लता सोनवणे, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा : “…तर लाडकी बहीण योजना रद्द करू”, सुप्रिम कोर्टाने राज्य सरकारला फटकारले, काय आहे संपुर्ण बातमी?