मुंबई, 14 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवरून विरोधकांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीच्या काळात तर कायदा व सुवव्यवस्था पूर्णपणे बिघडली होती. त्यावेळी गृहमंत्री जेलमध्ये गेले होते. मात्र, आता जो कुणी कायदा हातात घेणार त्याला सोडले जाणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
मुंबईत पत्रकारांसोबत संवाद साधताना मुख्यमंत्र एकनाथ शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात तर गृहमंत्री जेलमध्ये गेले होते. कायदा व सुवव्यवस्था पूर्णपणे बिघडली होती. उद्योगपतींच्या बंगल्याखाली बॉम्ब ठेवले जात होते. पोलिसांचा यामध्ये सहभाग होते. पोलिसांकडून प्रत्येक हॉटेलमधून हप्तेखोरी केली जात होती. अगदी त्याचवेळी कायदा व सुवस्थेची जबाबदारी सांभाळणारे गृहमंत्रीच जेलमध्ये होते. मात्र, आता जो कुणी कायदा हातात घेणार त्याला सोडले जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आणि त्यांना फाशीची शिक्षा केली जाणार, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
‘दादादागिरी खपवून घेतली जाणार नाही’ –
बाब सिद्दीकी हत्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाबा सिद्दीकी हे लोकप्रतिनिधी होते. ज्या आरोपींनी त्यांच्यावर फायरिंग केले, त्यामध्ये दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणात फास्ट्रॅक न्यायालयात खटला चालवून त्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची विनंती न्यायालयात केली जाईल. दरम्यान, बाहेर राज्यातून येऊन मुंबईत दादागिरी करणे हे आम्ही खपवून घेणार नाही. त्यांना जशास तसे ठोस उत्तर देऊ, असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला.
मुख्यमंत्र्यांची टोलमाफीवरून विरोधकांवर टीका –
मुंबईच्या टोलमाफीवर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज जी टोलमाफी करण्यात आली ती आधीपासून जनतेसह आमची मागणी होती. यामुळे ही टोलमाफी करण्यात आलीय…त्याचा निर्णय फक्त निवडणुकीसाठी नव्हे तर कायमस्वरूपी राहील. दरम्यान, त्यांना फक्त टोल घेण्याची सवय आहे. त्यांना फक्त घेणे माहितीये.. देणे माहित नाहीये. आमची लेना बँक नसून देना बँक आहे. असा निशाणा मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर साधला. आमच्या सरकारच्यावतीने सुरू केलेल्या योजनेवर टीका करण्याचा विरोधकांना कुठलाही नैतिक अधिकार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हेही वाचा : मुंबईत टोलमाफी, शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीतील 19 मोठे निर्णय वाचा एका क्लिकवर