नागपूर, 13 डिसेंबर : राज्यात लहान मुलींवरील बलात्कार व खुनासारख्या अमानुष आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गुन्ह्यांमध्ये दोषींना तत्काळ आणि कठोर शिक्षा मिळावी, यासाठी शासन ठोस पावले उचलत आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात तीन वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराची घटना विधानसभा सदस्य सुहास कांदे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मांडली, त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींना पोलीस तातडीने अटक करतात, मात्र न्यायप्रक्रियेला विलंब न होता गुन्हेगारांवर अपेक्षित वचक बसविण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित यंत्रणांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आले आहेत.
मालेगाव तालुक्यातील प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील तत्काळ नेमण्यात येणार असून, हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवले जाईल. सर्व पुरावे आणि साक्षी वेळेत गोळा करून निश्चित कालमर्यादेत न्यायालयासमोर सादर करण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
अत्यंत क्रूर, अमानवीय आणि समाजाला हादरवून टाकणाऱ्या घटनांमध्ये दोषींना फाशीपर्यंतची शिक्षा मिळावी, यासाठी शासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल, असे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अशा गुन्हेगारांना कायमचा धडा मिळाला पाहिजे आणि यासंदर्भात वचक बसला पाहिजे, ही शासनाची भूमिका असल्याचे सांगितले.
या लक्षवेधी सूचनेत सदस्य योगेश सागर, अतुल भातखळकर, किशोर पाटील, बालाजी कल्याणकर, श्रीमती सना मलिक यांनी उपप्रश्न विचारले.






