पुणे, 17 मार्च: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कर्वे समाज सेवा संस्था, आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल एज्युकेटर्स (MASWE) यांच्या संयुक्त विद्यमाने “उच्च शिक्षण आणि शाश्वत विकास” या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा नुकताच यशस्वीरित्या समारोप झाला. या परिषदेत देशभरातील शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, सामाजिक कार्य, उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी शिक्षण, संशोधन आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) च्या माध्यमातून शाश्वत विकासाचे ध्येय कसे गाठता येईल, यावर सखोल मंथन केले.
परिषदेच्या पहिल्या दिवशी पारंपारिक दीपप्रज्वलनाऐवजी मान्यवरांच्या हस्ते ‘रोपट्याला पाणी घालून’ अत्यंत कल्पक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विनायक कराळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले, तर उपाध्यक्षा सौ. शिल्पा पाठक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. स्वागतपर भाषणात संस्थेचे संचालक प्रा. महेश ठाकूर यांनी महर्षि धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याचा गौरव करत या परिषदेची भूमिका विषद केली.
या राष्ट्रीय परिषदेत नवी दिल्लीच्या ‘आयआयसीए’चे (IICA) सीएसआर प्रमुख श्री. मुकेश कुमार यांनी बीजभाषणात मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “सध्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या एकूण ‘सीएसआर’ निधीपैकी ३३ ते ४० टक्के वाटा केवळ शिक्षण क्षेत्राला मिळत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) युगात एमएसडब्ल्यू (MSW) विद्यार्थ्यांसाठी सीएसआर आणि सामाजिक सेवा क्षेत्रात करिअरच्या अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.” ‘मास्वे’चे अध्यक्ष प्रा. अंबादास मोहिते यांनी उच्च शिक्षणातील आर्थिक तरतूद वाढवण्याची आणि गांधीवादी मूल्यांची गरज व्यक्त केली.
यावेळी तसेच परिषदेच्या पहिल्या दिवशी – विविध मान्यवरांनी संशोधनार्थीं यांनी परिसंवाद चर्चा सत्रात सहभागी होत, उच्च शिक्षण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने चर्चा आणि संशोधन पेपर सादरीकरण केले. नीलम पांडे पाठक यांनी ‘रोजगार ढाबा’ या उपक्रमाद्वारे हजारो रोजगार कसे निर्माण केले, याचा प्रेरणादायी प्रवास मांडला. पहिल्या दिवसाची सांगता विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘कीर्तनाने’ झाली; ज्यामध्ये संतांची शिकवण आणि शाश्वत विकास यांचा सुरेख मेळ साधण्यात आला.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी १० ते सायं. ५:३० या वेळेत विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. ‘समाजकार्य शिक्षण आणि शाश्वत विकास’ तसेच ‘उद्योग आणि शैक्षणिक संस्थांचा समन्वय’ या विषयांवर महत्त्वपूर्ण परिसंवाद पार पडले. यामध्ये टाटा इन्स्टिट्यूट चे प्रा. डॉ. बिपीन जोजो, डॉ. पेखम बसू, प्रा. अभ्रा प्रतिप रे, डॉ. संजय भट्ट, आणि प्रा. संजय खरात, प्रा सुरेश पठारे, प्रा. आलोककुमार भारतीय,
यांसारख्या दिग्गजांनी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ (NEP) आणि प्रशासनावर सखोल परिसंवाद, चर्चा सत्रा सहभागी होत मार्गदर्शन केले. या राष्ट्रीय परिषदेचे मुख्य आकर्षण म्हणजे, देशभरातून आणि राज्यभरातून आलेल्या अनेक प्राचार्य , प्राध्यापक, आणि संशोधनार्थी यांनी आपले महत्त्वपूर्ण शोधनिबंध सादर केले.
दोन दिवसांच्या या ज्ञानमहोत्सवाचा समारोप डॉ. संजय भट्ट यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहभागी संशोधक आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. ही दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद अत्यंत कमी वेळेत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कर्वे संस्थेचे संचालक प्राचार्य प्रा. महेश ठाकूर, आयक्यूएसी (IQAC) समन्वयक प्रा. डॉ. शर्मिला रामटेके, कार्यक्रम नियोजन कमिटीचे सेक्रेटरी प्रा. चयन पारधी, प्रा. डॉ. चित्रलेखा राजुस्कर, प्रा. डॉ. देवानंद शिंदे, मंगेश तळमले, प्रकाश पवार, राहुल बिडवे, झैद अख्तर, व संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.






