मुंबई, 10 ऑक्टोबर : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे काल दिर्घ आजाराने वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात निधन झाले. दरम्यान, त्यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत आज अंतिमसंस्कार करण्यात आले. यावेळी रतन टाटा यांना अंतिम निरोप देण्यासाठी जनसागर लोटल्याचे दिसून आले.
रतन टाटा यांना अंतिम निरोप –
टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबईतील वरळी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी मुंबई पोलिसांच्यावतीने त्यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली.
हिंदुरितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार –
रतन टाटा हे पारशी समाजाचे होते. मात्र, त्यांच्यावर हिंदू रितीरिवाजानुसार विद्युत वहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, रतन टाटांचे पार्थिव आज सकाळपासून नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तेथे सर्व स्तरातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांचा पाळीव ‘गोवा’ श्वानाने देखील त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आदीसह राजकीय, सामाजिक, सिने क्षेत्र, उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटल्याचे पाहायला मिळाले.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : ‘श्यामची आई’ फेम मराठी अभिनेत्री गौरी देशपांडे यांची विशेष मुलाखत