मुक्ताईनगर, 10 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून यातच आता पुन्हा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर याठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण घटना –
नरेंद्र मोदी सरकारमध्ये केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री असलेल्या रक्षा खडसे यांच्या मालकीच्या रक्षा ऑटो फुएल्स या मुक्ताईनगरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला. ही घटना काल गुरुवारी रात्री पाऊणे अकरा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत 2 कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली. तसेच तोडफोड करण्यात आली. तसेच जवळपास एक लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर काल गुरुवारी रात्री पाऊणे अकरा वाजता घडलेल्या या थरारक घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.
प्रकाश माळी व दीपक खोसे अशी मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. काल रात्री या पेट्रोल पंपावर दोन दुचाकीवर 5 जण आले होते. या पाच जणांनी अचानक या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच कर्मचाऱ्यांच्या डोक्याला बंदूक लावत गल्ल्यातील आणि कर्मचाऱ्यांकडे असलेली जवळपास एक लाख रुपयांची रोकड लंपास केली. यासोबतच ऑफिसमधील संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तोडफोडही केली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ हे पथकासह घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी या प्रकरणी दरोडेखोरांचा पाठलाग करत 3 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. या घटनेनंतर जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून केंद्रीय मंत्री यांच्या पेट्रोल पंपावर झालेल्या दरोड्याच्या या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.