दहिगाव (यावल), 9 फेब्रुवारी : यावल तालुक्यातील दहिगाव येथे दोन गटांत वाद निर्माण झाला होता. दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सहायक जिल्हाधिकारी तसेच फैजपुर उपविभागीय अधिकारी अर्पित चव्हाण यांनी दहिगावात काल सायंकाळपासून 48 तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे आदेश काढले.
दहिगावात नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील दहिगाव येथे परवा रात्री दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, काल दिवसभर मोठ्या प्रमाणात दहिगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
48 तासांसाठी संचारबंदी लागू –
जळगाव जिल्ह्याच्या सहायक जिल्हाधिकारी तसेच फैजुपरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी अर्पित चौहान यांनी दहिगावात 8 फेब्रुवारी (गुरूवार) रोजी सायंकाळी साडे पाच वाजेपासून पुढील 48 तासांसाठी संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, या संचारबंदीच्या कालावधीत कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही, यामध्ये मात्र अत्यावश्यक सेवेतील बाबी सुरू राहणार आहेत. तसेच सर्व दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने देखील बंद राहणार आहेत.
उल्लंघन केल्यास कारवाई –
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 (1) अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबधितांच्या विरूद्ध प्रचलित कायद्यात नमूद केल्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, दहिगावात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून गावातील वातवरण नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू