जळगाव, 1 जानेवारी : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यासह देशात जल्लोष सुरू असताना काल रात्री जळगावात दोन गटात राडा झाल्याची घटना समोर आली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावामध्ये दोन गटांमध्ये वाद पेटला आणि जाळपोळ आणि दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर याठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, पोलिसांनी पाळधीत संचारबंदी लावली असून 20 ते 25 अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमकं काय घडलं? –
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात काल 31 डिसेंबरच्या रात्री दगडफेक आणि जाळपोळची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री गुलाबराव पाटलांच्या परिवाराला घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्याच्या आणि कारचा कट लागल्याच्या कारणातून हा वाद झाल्याचे समजते.
दुकांनांची जाळपोळ; 20 ते 25 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल –
दोन गटात राडा झाला असताना पाळधी गावचे काही तरुण आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. यानंतर संतप्त जमावाने पाळधी गावात दगडफेक करत जाळपोळ केली. या घटनेत 12 ते 15 दुकाने जाळली आहेत. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. आतापर्यंत 20 ते 25 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गावात संचारबंदी लावण्यात आली आहे.
पोलिसांनी केले आवाहन –
घटनेबाबत माहिती देताना जळगाव जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर म्हणाल्या की, धरणगाव पोलीस स्टेशनअंतर्गत पाळधी या गावात दोन गटात अंतर्गत वादामुळे राडा झाला. यानंतर या वादाचे पर्यावसन हे काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झाले होते. त्यासंदर्भात गुन्हा दाखल झाला असून काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत 20 ते 25 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. तसेच पाळधीत मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे.
दरम्यान, पाळधीत उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता कायदा हातात घेऊ नये. कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कुठलेही वर्तन नागरिकांचे नसावे तसेच सर्वांनी शांतता पाळावी, असे आवाहन कविता नेरकर यांनी केले आहे.
हेही पाहा : “….तर कदाचित ही अपघाताची घटना घडली नसती”; डंपर अपघात प्रकरणावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रतिक्रिया