मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 27 एप्रिल : जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातून ‘ऑनर किलिंग’ची घटना समोर आली आहे. सेवानिवृत्त पोलिस वडिलांनी आपल्या मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलगी आणि जावई यांच्यावर गोळीबार केला. चोपडा शहरातील एका हळदीच्या कार्यक्रमात काल 26 एप्रिल रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
यामध्ये मुलगी ठार झाली असून जावई गंभीररित्या जखमी आहे. तृप्ती वाघ (वय 25 रा. पुणे) मयत मुलीचे तर अविनाश वाघ (वय 26) असे जावयाचे नाव आहे. दरम्यान, या ऑनर किलिंग घटनेत संतप्त लोकांनी गोळीबार करणाऱ्या मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केल्याने त्यांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, चोपड्यातील ऑनर किलिंगच्या घटनेत गोळीबार करणारे मुलीचे वडिल हे सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय असून किरण मांगले असं त्यांचं नाव आहे. तसेच साधारण वर्षभरापूर्वी किरण मांगले यांची मुलगी तृप्ती हिने अविनाश वाघ याच्याशी प्रेमविवाह केला होता. विवाह झाल्यानंतर हे दाम्पत्य पुण्यात राहत होते.
प्रेमविवाह केल्याच्या रागातून गोळीबार –
अविनाशच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी चोपड्यात ते दोघे आले होते. याची माहिती मिळताच किरण मांगले चोपड्यात आले अन् थेट लग्नस्थळी पोहोचत आपल्या मुलीने प्रेमविवाह केल्याचा रागातून त्यांनी आपल्या जवळील बंदुकीने गोळ्या झाडल्या. दरम्यान, गोळीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला असून अविनाश गंभीरित्या जखमी झाला आहे. अविनाश वाघ याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गोळीबार करणाऱ्या वडिलांना ‘पब्लिक मार’ –
गोळीबारानंतर विवाह समारंभात आलेल्या संतप्त जमावाने किरण मांगले यांच्यावर हल्ला चढवून त्यांना मारहाण केली. यामध्ये किरण मांगले हे गंभीर जखमी झाले असून सध्या जखमींची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, तृप्तीची वाघची सासू प्रियंका ईश्वर वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावचे एसपी डॉ. महेश्वर रेड्डी काय म्हणाले? –
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे चोपड्यातील गोळीबाराच्या घटनेनंतर घटनास्थळी दाखल होता पाहणी केली. यावेळी डॉ. महेश्वर रेड्डी यांनी माहिती दिली की, चोपड्यातील एका लग्न समारंभात गोळीबाराची घटना घडली. तृप्ती मांगले या तरूणीने अविनाश वाघ या मुलासोबत प्रेमविवाह केला होता. यानंतर ते पुण्यात राहत होते.
View this post on Instagram
दरम्यान, अविनाश वाघच्या नातेवाईकडे लग्नसमारंभासाठी ते वाघ दाम्पत्य चोपड्यात आले होते. याची माहिती तृप्तीचे वडिल सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किरण मांगले यांना मिळाल्यानंतर त्यांनी शिरूर येथून चोपड्यात येत तृप्ती आणि अविनाशवर गोळीबार केला. यामध्ये तृप्तीचा मृत्यू झाला आणि अविनाश जखमी झाला. तसेच किरण मांगले याला उपस्थितांनी पब्लिक मार दिल्याने त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत.
किरण मांगले यांच्याकडे बंदुकीचा परवाना होता आणि त्याच बंदुकीच्या माध्यमातून त्यांना गोळीबार केल्याचे प्राथमिक माहिती समोर आली असून याप्रकरणी आता पंचानामा करण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी जे-जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलीय.
हेही पाहा : UPSC Yogesh Patil Success Story : जळगावच्या 26 वर्षांच्या तरुणाचं UPSC परिक्षेत घवघवीत यश