चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
लातूर : लहानपणापासून बहुतांश जणांना वाटते की, आपण मोठे झाल्यावर अधिकारी व्हायला हवं. पण यातले अगदी मोजकेच मोठे झाल्यावर अधिकारी होतात. उच्च पदावर जातात. त्यात यूपीएससीचा विषय असेल तर आणखी कठोर मेहनत घ्यावी लागते. मात्र, या सर्व परिस्थितीचा सामना करत महाराष्ट्रातील लातूरच्या एका कन्येनं महाराष्ट्राला अभिमान वाटेल, अशी कामगिरी करून दाखवली आहे.
लातूरच्या प्रतिक्षा भाग्यश्री नानासाहेब काळे यांनी यूपीएससीच्या देशातील सर्वात कठीण भारतीय वनसेवेच्या परिक्षेत संपूर्ण देशातून दुसरा क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या या यशानंतर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या टीमने त्यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी आपल्या प्रवासाच्या अत्यंत महत्त्वाच्या आठवणींना उजाळा देत, विद्यार्थी, पालकांना प्रेरणा मिळेल, या सर्व विषयांवर भाष्य केले.
शिक्षण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी –
प्रतिक्षा भाग्यश्री नानासाहेब काळे या लातूर येथील रहिवासी आहेत. त्यांचे पहिली ते सातवीचे शिक्षण हे लातूर येथील लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय येथे झाले. तर आठवी ते दहावीचे शिक्षण हे सरस्वती विद्यालय लातूर येथे झाले. त्यांना 2008 मध्ये दहावीला 98.61 टक्के गुण होते. तर अकरावी-बारावीचे शिक्षण त्यांनी लातूर येथीलच राजर्षी शाहू महाविद्यालय येथे घेतले. 2010 मध्ये बारावीला त्यांना विज्ञान शाखेत 92.33 टक्के गुण होते. तसेच एमएचटी-सीईटी परिक्षेत 200 पैकी 189 गुण होते. बारावीच्या शिक्षणानंतर कॉलेज ऑफ इंजीनिअरींग पुणे याठिकाणी त्यांनी मेकॅनिकल इंजीनिअरींगची पदवी घेतली. त्यांचे वडील नानासाहेब काळे हे लातूर येथील राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयात लेक्चरर होते. मागच्या वर्षी ते निवृत्त झाले. तर आई भाग्यश्री काळे या गृहिणी आहेत. तसेच त्यांची लहान बहीण आयटी इंजीनिअर असून एक मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करते.
कधी वाटलं यूपीएससीमध्ये करिअर करावं –
बालपणापासूनच वाटत होतं, की आपण एक दिवस मोठं अधिकारी व्हावं. लहानपणी जेव्हा कुणी विचारायचे त्यावेळी माझे पालकही, आमच्या मुलीला कलेक्टर करायचंय, असं सांगायचे. माझे वडील लेक्चरर असल्याने घरी सीएसआरचं मॅगझिन यायचं, त्यामध्ये त्यावेळेच्या टॉपर्सचे फोटो, त्यांच्या मुलाखती असायच्या. त्यासोबच जीके रिलेटेड बुक्स, या सर्व वाचनामुळे माझी आवड त्यात वाढत गेली त्यासोबतच, हे नेमकं काय आहे, हे मला समजत गेलं. त्यासोबतच तुम्हाला काहीही चांगलं करायचं, असेल तर तुम्हाला या क्षेत्रात जावं लागेल, असं मी ऐकून होते. दहावीपर्यंत या सर्व गोष्टी कानावर पडत गेल्या. त्यामुळे तेव्हाच ठरवलं की, यूपीएससीच्या स्पर्धा परिक्षेतून लोकसेवेतच करिअर कराचयं.
यूपीएससीची तयारी कशी सुरू केली –
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, मेकॅनिकल इंजीनिअरींगच्या शिक्षणानंतर पुण्यातच मी ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या मार्गदर्शनाखाली यूपीएसचीच्या तयारीला सुरुवात केली. त्याठिकाणी विविध सर्व्हिसेसमध्ये निवड झालेले विद्यार्थी अभ्यासासाठी बसतात. यामध्ये ज्यांना रँक इम्प्रूव्ह करायची असते, एमपीएससी झाले, त्यानंतर यूपीएससी करायचे आहे, अशा विद्यार्थ्यांचा त्याठिकाणी समूह असतो. तिथे कोचिंग नव्हे तर अशा पद्धतीने मार्गदर्शन मिळते. पण यासोबतच मी इतर कोणत्याही प्रकारचे कोचिंग किंवा क्लासेस लावले नाही. सेल्फ स्टडीवर भर दिला.
यानंतर 2015 मध्ये मी पहिल्यांदा यूपीएससीची प्रीलिअम्स दिली. ती मी पासही झाले. पण तोपर्यंत मला फॉरेस्ट सर्व्हिस नावाचा काही प्रकार असतो, हे माहिती नव्हते, हे मला प्रामाणिकपणे सांगावासं वाटतं. ज्याप्रमाणे अनेकांना आयएएस, आयपीएस या दोन सर्व्हिसेसच सर्वांना माहिती असतात, त्याप्रमाणे मलाही याच दोन सर्व्हिसेस बाबत माहिती होती. पण 2015 चा फॉर्म भरताना पहिल्यांदा मला याबाबत कळाले.
दरम्यान, 2015 ते 2019 पर्यंत नागरी सेवा परीक्षा म्हणजे आयएएस याच सेवेसाठी माझे प्राधान्य होते आणि मी त्यासाठीच तयारी करत होते. यामध्ये 2015 मध्ये मी पूर्व परीक्षा पास झाले. मात्र, मुख्य परीक्षेत मला अपयश आले. पण यामुळे माझा आत्मविश्वास वाढला होता. त्यामुळे 2016 पासून मी नागरी सेवांसोबतच आयएफएसचाही फॉर्म भरत गेले. मात्र, दोन्ही परिक्षांच्या दबावामुळे 2016 च्या पूर्व परीक्षेतच मला अपयश आले. या सर्व अपयशातूनही मला बरंच काही शिकायला मिळालं.
Indian Forest Service का निवडली?
यानंतर 2017 मध्ये मी पूर्व परीक्षा पास झाली. यानंतर आयएफएसची मेन्सही दिली. जसा अभ्यास वाढला तसं फॉरेस्ट सर्व्हिसेसचं महत्त्वं कळालं. आपण विकासाच्या बाबतीत बोलतो मात्र, आपलं आयुष्यच जर सुरक्षित नसेल तर मग या विकासाला काय अर्थ उरणार? अशी समज येत गेली. क्लायमेंट चेंजचा हा इतका गंभीर प्रश्न आपल्या दारासमोर येऊन ठेपला आहे. या सर्व गोष्टींनी मला प्रभावित केलं. त्यामुळे माझा जो मूलभूत क्षेत्रांमध्ये योगदान देण्याच उद्देश्य होता. तो या सेवेतूनही साध्य होऊ शकतो, असं मला वाटलं. त्यासोबत मला ऑफिसमधून काम न करता, लोकांमध्ये जाऊन काम करायचं होतं, म्हणून मला मग या सेवेमध्येच जाणं, हे महत्त्वाचं वाटू लागलं. त्यामुळे 2018 पासून मला नेमकं काय करायचं आहे, कोणत्या सेवेत जायचं आहे, हे पूर्णपणे उमगलं होतं.
MPSC मध्ये राज्यात पहिल्या –
याच दरम्यान, मी या क्षेत्रातील काही मान्यवरांशी बोलली, त्यावेळी त्यांनी असा सल्ला दिला की, खरंच मला या क्षेत्रात करायचं असेल तर महाराष्ट्र वनसेवेची परीक्षाही द्यायला हवी. त्यांनी मला याची बरेचशी कारणं सांगितली. त्यांचा सल्ला मी महत्त्वाचा मानला आणि सर्व विचार करुन महाराष्ट्र वनसेवा 2018 ची परीक्षा दिली. माझा यूपीएससीचा अभ्यास स्ट्राँग असल्याने मी एमपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तिघांमध्ये पास होत 2019 मध्ये महाराष्ट्रात मुलींमध्ये पहिली आली आणि महाराष्ट्र वनविभागात सहाय्यक वनसंरक्षक (Assistant Conservator of Forest) म्हणून माझी निवड झाली.
2019 आएफएस मेन्सच तो अनुभव –
पण यासोबतच 2019 मध्ये मी पुन्हा यूपीएससीची दिली. त्यामध्ये नागरी सेवेत मी यशस्वी होईल, असा मला विश्वास होता. त्यामुळे मी पूर्व परीक्षेत पास झाले. यानंतर मी नागरी सेवेची मुख्य परीक्षा दिली. पण त्यात मी पास होऊ शकले नाही. मात्र, त्याचवेळी मी आयएफएसच्या मुख्यसाठीही पात्र ठरले. मी मुख्य परीक्षा दिली. या दरम्यान, 2019 च्या आयएफएस मेन्समध्ये एक अनुभव घडला जो मला आजही लक्षात आहे. सर्व सुरळीत होतं. व्यवस्थित होतं. पण परिक्षेच्या आधी माझी तब्येत खराब झाली. परीक्षेच्या आठवडावर मी दवाखान्यात होते आणि अशा परिस्थितीत परीक्षा देणे हे रिस्की आहे, असे आमचे फॅमिली डॉक्टर म्हणाले. पण माझी तयारी खूप चांगली झाली होती आणि त्यामुळे मी त्यांना विनंती केली. नागपूरला माझी परीक्षा होती. मी गेली. मला परिक्षेत काहीही मला उजळणी करता आली नाही. माझे आईबाबा माझ्यासोबत होते. औषधी त्यावेळी सुरू होत्या. मला लिहिता येत नव्हते. अशा परिस्थितीत मी पूर्ण परीक्षा दिली, हेच मला माझ्यासाठी यश वाटत होते. पण अशा परिस्थितीत दिलेल्या परिक्षेतही मी पास झाली आणि यानंतर 2020 मध्ये माझी मुलाखत झाली. त्यात मला अपयश आले. पण मी ज्या परिस्थितीत परीक्षा दिली, ते माझ्या दृष्टीने यश होते म्हणून मला मुलाखतीत अपयश आले तरी मी त्यात खचले नाही.
राष्ट्रीय पातळीवरच्या ट्रेनिंगमध्येही दुसरा क्रमांक –
पण माझी सहायक वनसंरक्षक (Assistant Conservator of Forests) म्हणून निवड झाली होती. त्याच्या 2 वर्षाच्या ट्रेनिंगसाठी मी तामिळनाडू राज्यातील कोइम्बतूर येथे गेले. Central Academy of State Forest Service, Coimbatore याठिकाणी नोव्हेंबर 2020 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान माझी ट्रेनिंग झाली आणि देशपातळीवरच्या या ट्रेनिंगमध्येही संपूर्ण बॅचमध्ये मी दुसरा क्रमांक मिळवला. या दरम्यानही मला आयएफएससाठी प्रयत्न करायचे आहेत, हे मी ठरवलेच होते. पण ट्रेनिंग दरम्यान मी कोणताही अटेम्प्ट दिला नाही. 2019 ते 2023 पर्यंत मी ब्रेक घेतला होता. ट्रेनिंगनंतर सुरुवातीला कोल्हापूर वनविभागात तर नंतर गडचिरोली वनवृत्त याठिकाणी प्रोबेशनचा कालावधी – 1 वर्ष पूर्ण झाल्यावर मी नोव्हेंबर 2023 पासून मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे सिपना वन्यजीव विभागात सहायक वनसंरक्षक म्हणून रूजू झाली आहे.
प्रोबेशनदरम्यान पुन्हा तयारी सुरू –
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, सहायक वनसंरक्षक म्हणून माझा प्रोबेशन कालावधी सुरू झाल्यावर जानेवारी 2023 मी पुन्हा माझ्या यूपीएसीच्या तयारीला सुरुवात केली. यावेळी मी फक्त आयएफएससाठीच तयारी केली. या अटेम्प्टमध्ये मी पूर्व, मुख्य आणि मुलाखत आणि सर्व टप्पे पार केले आणि देशात दुसरा क्रमांक मिळवला. माझ्या स्पर्धा परिक्षेच्या काळात मी पुणे, दिल्ली, बंगळुरू येथे राहून तयारी केली. विविध प्रकारचं मार्गदर्शन मिळावं, म्हणून याठिकाणी जाऊन मी सेल्फ स्टडी केला. माझ्या या संपूर्ण प्रवासात माझे आई-वडील, बहीण आणि मित्रपरिवाराचा मोठा वाटा आहे, असे त्या म्हणाल्या.
नोकरी करत असताना परिक्षेची तयारी करणं तितकं सोपं नव्हतं. वेळेचं व्यवस्थापन करणं महत्त्वाचं होतं. पण मी या सर्व परिस्थितीवर मात करत अभ्यास करत राहिला. ऑनलाईन मटेरिअलचा मी पुरेपूर वापर करुन माझी कौशल्य विकसित केली. सर्व सुट्ट्याही मी अभ्यासासाठी वापरल्या. यामुळे माझी अभ्यासाची क्षमताही वाढली. परिक्षेसाठी सरावही मी खूप केला. माझ्यापर्यंत अभ्यासाचं साहित्य पोहोचेल, याची काळजीही माझ्या काही मित्रांनी घेतली, त्यांचेही मी खूप आभार मानते. अशाप्रकारे मी व्यवस्थित प्लान करुन त्याची अंमलबजावणी केली, असे त्या म्हणाल्या.
शिक्षण आणि करिअर या दोन्ही वेगळ्या गोष्टी –
सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मेकॅनिकल इंजीनिअरींग ही माझी आवड म्हणून निवडलले क्षेत्र होते. या क्षेत्रात करिअर करण्याचा उद्देश्य नव्हता. मला असं वाटतं की, शिक्षण हे आपल्या विकासाचं, जाणून घेण्याचं माध्यम आहे. मला मशिन्समध्ये आवड आहे. शिक्षण आणि करिअर या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, असं मला वाटतं. त्यामुळे मी पदवीला ते क्षेत्र निवडलं.
तरुणाईला, पालकांना दिला मोलाचा सल्ला –
विद्यार्थ्यांना सल्ला देताना त्या म्हणाल्या की, बहुतांश जणांना वाटते की, आपण स्पर्धा परिक्षा करायला हवे. पण प्रत्येकाने अधिकारी व्हावं हा अट्टहास समाजाने सोडण्याची गरज आहे. आपण सर्व श्रेय हे अधिकाऱ्यांना देऊन टाकलं आहे. हे कुठेतरी चुकीचं आहे. कोणतंही काम कमी किंवा जास्त असं नसतं. प्रत्येकानं आपली क्षमता जिथं वापरता येईल, ते काम करावं. समाजाने कुठल्याच कामाला कमी लेखू नये. ते महत्त्वाचं आहे, अशा दृष्टीने बघावं. तसेच विद्यार्थ्यांनी कुठल्याही दबावाखाली कुठलंही करिअर करू नये. मला तर हे करायचंच नव्हतं, हे नंतर म्हणणं योग्य नाही. समाज म्हणतंय म्हणून करू नका. तर आपल्याला झेपेल तर करा. यूपीएससीच्या तयारीने व्यक्ती एक चांगला माणूस घडतो. फक्त हे समजायला हवं. योग्य ठिकाणी थांबणं महत्त्वाचं आहे. म्हणून थोडा वेळ घेऊन, आपल्या पालकांना समजावून आपल्या आवडीच्या क्षेत्रात ठसा उमटवावा, असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी आजच्या विद्यार्थ्यांना दिला. तसेच आई वडिलांनी आपल्या मुलांना सहकार्य करायला हवे. पालकांच्या आणि पाल्यांच्या आवडीमध्ये तफावत असू शकते. यातला सुवर्णमध्य काढायला हवा. आपल्याला सर्वच क्षेत्रातील चांगले लोकं हवेत आहेत. त्यामुळे आपल्या पाल्यांच्या आवडींना सपोर्ट करायला हवा, असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा – सामनेरच्या तरुणाची गरुडझेप! UPSC परीक्षेत मिळवलं मोठं यश; वाचा, कुणालची प्रेरणादायी कहाणी
हेही वाचा – Special Interview : जळगावच्या डॉ. नेहा राजपूत UPSC मध्ये देशात 51 व्या, तरुणाईला दिला हा मोलाचा सल्ला