पुणे, 11 जानेवारी : राज्यात महायुती सरकार आल्यानंतर लाडकी बहिण योजनेचा सातवा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. असे असताना लाडकी बहिण योजनेबाबत चर्चा सुरू असते. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहिण योजनेबाबत महत्वाचे भाष्य केले आहे.
उपमुख्यमंत्र्यांचे लाडकी बहिण योजनेबाबत महत्वाचं भाष्य –
भविष्यात कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. लाडकी बहीण योजना सुरू करत असताना माझी राजकीयदृष्ट्या चेष्टा करण्यात आली होती. मात्र, ही योजना सुरळीत सुरू असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड सोसायटीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
बीड प्रकरणाबाबत काय म्हणाले? –
पोलिसांनी आदरयुक्त दबदबा निर्माण केला पाहिजे. तसेच महिलांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या नराधमांना सात आठवतील अशी कारवाई केली पाहिजे. बीड येथील प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात कोण जवळचा आणि कोण बाहेरचा असे न करता आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करून कुणालाही माफी मिळणार नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या विकासासाठी मोट बांधली –
भविष्यात शेतकऱ्यांना राज्यात सोलारमार्फत वीज दिली जाणार आहे. खरंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी, अशा तिघांनी मिळून महाराष्ट्राच्या विकासासाठी मोट बांधली असून महाराष्ट्राचा विकास करीत असताना कुणीही राजकारण करू नये. तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित येऊन विकासाला हातभार लावावा, असे अजित पवार म्हणाले.
हेही वाचा : Video : “लाच ती ‘लाच’च असते!”, जळगावात मंत्री गुलाबराव पाटलांनी सरकारी कर्माचाऱ्यांना सुनावलं, पाहा व्हिडिओ