चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पुणे, 21 जुलै : आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनितीचाच एक भाग म्हणून पुण्यातील बालेवाडी येथे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशन पार पडले. दरम्यान, या अधिवेशनात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जोरदार भाषण केले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? –
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो. आज मी तुम्हाला परवानगी देत असून ज्याला बॅटिंग करायची आहे, त्याने करा. मैदानात उतरा पण अट एकच आहे ती म्हणजे की हीट विकेट व्हायचे नाही आणि सेल्फ गोल करायचा नाही. काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावर बोलतात. काही लोक असे आहेत की, ते बोलल्यावर त्याचीच उत्तरे चार दिवस द्यावी लागतात. आदेश विचारू नका, मैदानात उतरा आणि ठोकून काढा, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.
मराठा आरक्षणावर काय म्हणाले? –
मराठा समाजातील गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, ही भाजपाची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे. आरक्षणाची लढाई ही 1982 साली चालू झाली. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी स्वत:ला गोळी घालून घेतली होती. 1982 सालापासून अनेक सरकारे आली आणि यामध्ये शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. मात्र, त्यांनी तेव्हा मराठा आरक्षण का दिले नाही, असा प्रश्न यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित केला. जोपर्यंत आम्ही होतो तोपर्यंत आम्ही आरक्षण टिकवले. दुर्दैवाने महविकास आघाडीचे सरकार आले अन् आरक्षण गेले. आता आम्ही पुन्हा मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन करून दाखवू –
आपण जिंकणार ही मानसिकता घेऊन जा. आज मी याठिकाणाहू तुमचा प्रतिनिधी म्हणून मी याठिकाणी घोषणा करतो की, भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष असेल आणि महायुतीचे सरकार आपण या महाराष्ट्रात स्थापन करून दाखवू, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला.
हेही पाहा : Special Interview : ‘त्या’ शाळांना आरटीईची प्रक्रिया राबवावीच लागेल – अॅड. दीपक चटप यांची विशेष मुलाखत