अमरावती, 3 ऑगस्ट : आगामी विधानसभा निवडणुकीपुर्वी राजकीय पक्षातील नेत्यांकडून पक्षाच्या मजबुतीसाठी विविध ठिकाणच्या दौऱ्यांचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे भाजपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढचे तीन महीने मला द्या, मी तुम्हाला राज्यात तुमचं सरकार देतो, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? –
अमरावीत कार्यकर्ते-पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात आज पुन्हा नव्या दमाने मैदानात उतरण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आजचा दिवस तुम्ही लिहून घ्या, आपण जर एकजुटीने मैदानात उतरलो तर या विधानसभेत महायुतीचा भगवा रोवल्याशिवाय आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. कारण, जनतेला पुन्हा एकदा हे लक्षात आला आहे की, खरे कोण आहे आणि खोटे कोण आहेत.
जनता आपल्या पाठीशी असून या खोट्या लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी पुन्हा आपल्याला मैदानात उतरावे लागेल. दरम्यान, गेली तीन महिने तुम्ही घरी होता, आता पुढची तीन महिने मला द्या. मी पुन्हा एकदा तुम्हाला राज्यात तुमची सत्ता देतो, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
विरोधकांवर जोरदार टीका –
उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, ज्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने जिंकण्याची उर्मी आहे आणि पुन्हा एकदा आपण पूर्ण ताकतीने जर का मैदानात उतरलो. तसेच तुमच्यासारखे मावळे जर आमच्यासोबत असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा तुमचे सरकार मी आणून दाखवेलच. विरोधी पक्षातील लोक सत्तेत आले तर केवळ पैसा जमा करतात. मात्र, सत्ता गेली की यांना गरीब, शेतकरी, कष्टकरी आठवतो, असा खोचक टोला त्यांनी विरोधकांना लगावला. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच यांचे सूत्र आहे आणि हीच त्यांची मानसिकता असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.