ठाणे, 14 फेब्रुवारी : जेव्हा मी गुवाहटीला गेलो तेव्हा एक-एक करत 50 आमदारांनी एक साध्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला. यावेळी राज्याने नव्हे तर 32 देशांनी नोंद घेतली की, ‘Who is Eknath Shinde?’ कोण आहे एकनाथ शिंदे? खरंतर, एकनाथ शिंदे साधा कार्यकर्ता आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. पण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. धर्मवीर आनंद दीघे साहेबांचा शिवसैनिक आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राजन साळवी यांनी काल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, मला कोणी हलक्यात घेऊ नये, असा इशाराही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला.
सर्वसामान्य कार्यकर्ता ते या राज्याचा मुख्यमंत्री हा इतिहास –
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, घरी बसलेल्यांना लोक स्विकारत नाही, हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दिलंय. खरंतर, हा एकनाथ शिंदे जिथून उभा राहतो, तिथूनच नवी लाईन सुरू होऊन जाते. ही लाईन कामाची असते. विकासाची असते. लोकांच्या सेवेची ही लाईन असते. दरम्यान, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे.
दरम्यान, सर्वसामान्य कार्यकर्ता ते या राज्याचा मुख्यमंत्री हा इतिहास घडलाय. यामागे बाळासाहेबांचे तसेच दीघेसाहेबांचे आशिर्वाद आहेत. यासोबतच कार्यकर्त्यांची मेहनत तसेच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसोबतच सर्वांचे आशिर्वाद आहेत. एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, हा इतिहास देखील महाराष्ट्राने पाहिलाय, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
राजन साळवींचा शिवसेनेत प्रवेश –
राजन साळवी हे तीन वेळा आमदार म्हणून राहिले आहेत. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा देत त्यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. तसेच राजापूर विधानसभा मतदार संघातून राजन साळवींनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदे गटाच्या किरण सामंत यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. यावेळी किरण सामंत यांनी राजन साळवींचा पराभव केला होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजन साळवींनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. यामुळे ठाकरेंच्या शिवसेनाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत