नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : मी गेल्या आठवड्यात जपानमधील श्री.पुराणिक यांच्याशी बोललो. जपानमध्ये जाऊन ते आमदार झालेत. यानंतर सरकारने त्यांना शिक्षण विभागाची जबाबदारी दिली आणि त्यांनीही आमदारकी सोडली. अशी पुराणिक यांच्यासारखी माणसे सातासमुद्रापार आपल्या मराठीचा अटकेपार झेंडा फडकवत असल्याचे गौरोवद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुळचे अंबरनाथ येथील असलेले आणि सध्या जपानमध्ये असलेले योगेंद्र पुराणिक यांच्याबाबत काढले. नवी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
सातासमुद्रापलीकडे मराठी भाषा आणि संस्कृती टिकवणाऱ्या मराठी बांधवांची दखल घेण्यासाठी विश्व संमेलन नुकतेच आयोजित केले. यामध्ये अनेक देशांचे लोक आलेत. जगातील कान्याकोपऱ्यातील मराठी माणसांनी हजेरी लावली. आणि म्हणून मराठी माणसांनी मराठीचा झेंडा अभिमानाने फडकत ठेवणाऱ्यांचा दखल घेत त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न केला असल्याचेही एकनाथ शिंदे म्हणाले.
भाषा ही आपली ओळख, अस्मिता, आणि अभिमान असून भाषा हेच आपले अस्तित्व आहे. भाषा संपली तर आपले अस्तित्वही संपेल हे लक्षात घेऊन तिच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटीबद्ध व्हावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी केले. यासोबतच समाज माध्यमांवर देखील मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषामंत्री उदय सामंत, संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, लोकमत वृत्तपत्रसमूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी डी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासह अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, कार्यवाह डॉ.उज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, निमंत्रक संजय नहार, शैलेश पगारिया, युवराज शहा यांच्यासह साहित्य महामंडळाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
हेही वाचा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत