पुणे, 19 फेब्रुवारी: राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी पदभार स्विकारला आहे आणि यानंतर आज शिवजयंतीनिमित्त शिवनेरी गडावर आयोजित शासकीय कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. दरम्यान, या कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय म्हणाल्या? –
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी शिवनेरी किल्ला, ही शिवजन्मभूमी केवळ ऐतिहासिक स्थळ नव्हते, तर ते त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे प्रेरणास्थळही होते. पवित्र शिवनेरी किल्ल्याविषयी केवळ जिव्हाळाच नव्हता, तर या शिवजन्मभूमीचे सौंदर्य वाढावे, तिचा ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि भावी पिढ्यांना अभिमानाने दाखवता यावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून ‘किल्ले शिवनेरी विकास आराखडा’ साकार झाला आणि या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला.
गेल्या वर्षी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत किल्ले शिवनेरीचा समावेश झाला आहे. त्यापूर्वीच शिवजन्मभूमी शिवनेरीसह राज्यातील गडकोटांच्या जतन-संवर्धनासाठी त्यांनी निधीची तरतूद केली होती. केवळ शिवनेरी किल्ल्यापुरते मर्यादित न राहता, शिवजन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्याला पर्यटन तालुका म्हणून विकसित करण्याचा संकल्प त्यांनी ध्यासाने घेतला होता आणि त्या दिशेने ठोस पावले उचलली होती, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.
सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या की, गेल्या अर्थसंकल्पात आग्रा येथे महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे शिवस्मारक उभारण्याचा निर्धार, पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक तसेच संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा समावेश आहे, असा संकल्प करण्यात आला होता.
किल्ले रायगड विकास आराखडा व स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ तुळापूर आणि समाधी स्थळ वढू बुद्रुक येथे स्मारकाचे काम अत्यंत वेगाने सुरु असून ही सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. या प्रत्येक स्मारकातून भावी पिढ्यांना प्रेरणा, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश मिळत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक घटकाची काळजी घेण्याची शिकवण आपल्याला दिली असून त्याच विचारांवर आणि रयतेचं राज्य’ या संकल्पनेवर राज्य सरकार पुढे वाटचाल करीत आहे. शिवछत्रपतींच्या स्वप्नातील सुजलाम सुफलाम, न्याय आणि समृद्ध स्वराज्य घडवण्यासोबतच यापुढेही महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अभिनेता रितेश देशमुख, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.






