नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची आणि मतमोजणीच्या तारखेची घोषणा केली.
कधी होणार दिल्ली विधानसभेची निवडणूक –
दिल्ली विधानसभेची निवडणूक पुढच्या महिन्यात 5 फेब्रुवारीला होणार आहे. तर यानंतर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीच्या 70 विधानसभा जागांवर निवडणूक होणार आहे. यामध्ये यावेळीही दिल्लीत आम आदमी पार्टी, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना शिष्टाचाराची काळजी घ्यावी. महिलांबद्दल असभ्य भाषा वापरू नका. निवडणूक प्रचारात भाषेची काळजी घ्या, असे सांगितले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताना निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, दिल्लीत 13 हजारांहून अधिक मतदान केंद्रे असतील. 85 वर्षांवरील व्यक्ती घरबसल्या मतदान करू शकतील. निवडणुका हा आपल्या सर्वांचा समान वारसा आहे.
दिल्लीत एकूण किती मतदार –
दरम्यान, सोमवारी निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी जाहीर केली होती. यावेळी दिल्लीत एकूण 1 कोटी 55 लाख 24 हजार 858 मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, यावेळी दिल्ली निवडणुकीत एकूण 1.55 कोटींहून अधिक मतदार असतील. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 83,49,645 आहे, तर महिला मतदारांची संख्या 71,73,952 आहे. तर तृतीयपंथींची संख्या 1,261 आहे.
VIDEO : आठवड्यात 6 जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अपघात कधी थांबणार?, जिल्हाधिकारी Ayush Prasad Exclusive