धुळे – संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून सुरू झाले असून ते 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये दररोज विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये विविध प्रश्नांवरुन, मुद्द्यांरुन खडाजंगी होत असताना आज धुळ्याच्या खासदारांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्न हा विषयाशी संबंधित नसल्याचे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधवांनी सांगितले.
काय म्हणाल्या धुळ्याच्या खासदार –
संसदेत प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न क्रमांक 263 आयुर्ज्ञान योजनेअंतर्गत क्षमता वाढवणे या दरम्यान, धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव यांनी सभागृहात प्रश्न विचारला. यावेळी त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्यासाठी 5 एकीकृत आयुष रुग्णालये मंजूर करण्यात आले आहेत. धाराशिव, जळगाव, जालना, ठाणे आणि नागपूरमध्ये ही रुग्णालये मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, एकाही रुग्णालयाचे बांधकाम सुरू झालेले नाही. यासाठी का उशीर झाला, यामागचे कारण काय आहे, रुग्णांची दुर्दशा पाहता सरकार माझ्या धुळे या लोकसभा मतदारसंघात आयुष रुग्णालय स्थापनेचा विचार करत आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला.
केंद्रीय मंत्र्यांनी काय उत्तर दिलं?
यावर केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव म्हणाले की, सन्माननीय सदस्यांनी विचारलेला प्रश्न हा या प्रश्नाशी संबंधित नाही. मात्र, मी त्यांच्या माहितीसाठी सांगतो की, आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून जिल्हास्तरावर 50 खाटांचे रुग्णालय, तालुकास्तरावर 30 खाटांचे रुग्णालय देण्याची आमची योजना आहे. तसेच याठिकाणी ज्या सर्व रुग्णालयांना मंजुरी मिळाली आहे, त्यावर राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यावर त्याला आयुष मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणूक हे विधेयक मंजूर केले असून याच हिवाळी अधिवेशनात येत्या आठवड्यात हे विधेयक संसदेत मांडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हे विधेयक पुढच्या आठवड्यातच मांडले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Video : संसदेत रस्ते अपघाताचा मुद्दा अन् केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितली ‘ती’ अपघाताची घटना