जळगाव, 14 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेतलेल्या इ. 12वीच्या परीक्षेचा निकाल सोमवार, दि. 5 मे 2025 रोजी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला.
या परीक्षेच्या गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्रे व तपशीलवार गुणपत्रकांचे शालेय अभिलेख दिनांक 16 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता संबंधित विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना वितरित करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी 3 वाजता संबंधित शाळा व महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका वितरित केल्या जातील. या अनुषंगाने सर्व प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांनी योग्य ती नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
यंदा बारावीचा राज्याचा निकाल 91.88 टक्के –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालानुसार यंदा बारावीचा निकाल 91.88 टक्के लागलाय. तसेच विभागनिहाय निकालात कोकण विभागात सर्वाधिक 96.74 टक्के इतका तर सर्वाधिक कमी लातूर विभागाचा 89.46 टक्के निकाल लागलाय. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल 94.58 टक्के इतका तर मुलांचा निकाल 89.51 टक्के इतका लागलाय. मुलांपेक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलींची संख्या जास्त असून मुलांपेक्षा मुलींचा निकाल हा 5 टक्क्यांनी अधिक आहे.
विभागनिहाय निकाल –
- कोकण : 96.74 टक्के
- पुणे : 91.32 टक्के
- कोल्हापूर : 93.64 टक्के
- अमरावती : 91.43 टक्के
- छत्रपती संभाजीनगर : 92.24 टक्के
- नाशिक : 91.31 टक्के
- लातूर : 89.46 टक्के
- नागपूर : 90.52 टक्के
- मुंबई : 92.93 टक्के