नंदूरबार, 27 डिसेंबर : अखेर नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा निकाल तब्बल 12 तासांनी जाहीर झाला. यात भरत दादा गावित पुरस्कृत परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. तर आ. शिरीष नाईक पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल पराभूत झाले आहे. या निकालाने डोकारे आदिवासी साखर कारखान्यावर परिवर्तन पॅनलने परिवर्तन घडवून आणले आहे. जाणून घेऊयात, ही निवडणूक नेमकी कशी झाली.
माजी मंत्री स्वरूपसिंग नाईक. आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या मार्गदर्शनाखाली तीस वर्षांपूर्वी सहकारी तत्त्वावर नवापूर तालुक्यातील आदिवासी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. मागील तब्बल 25 वर्षांपासून डोकारे आदिवासी साखर कारखान्यात मंडळाची निवड बिनविरोध होत होती. मात्र, नवापूर तालुक्यात राजकीय पक्ष अदलाबदलांमुळे साखर कारखान्याची निवडणूक झाली.
भाजप नवापूर तालुका अध्यक्ष भरत माणिकराव गावित यांनी परिवर्तन पॅनल उभे केले. तर त्यांच्याविरोधात काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक यांच्या शेतकरी विकास पॅनलचे आव्हान होते. या दोन्ही पॅनेलमध्ये ही सरळ लढत झाली. या निवडणुकीसाठी 24 डिसेंबरला मतदान झाले. यानंतर 25 डिसेंबरला मतमोजणी झाली. याठिकाणी बॅलेट पेपरद्वारे मतमोजणी झाली आणि तब्बल 12 तासांनी मतमोजणी झाली आणि निकाल उशिरा जाहीर झाला. यात भरत दादा गावित पुरस्कृत परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.
17 पैकी 14 जागांवर बाजी –
डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना मंडळात 17 संचालक पदांची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये शिरीष नाईक पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे २ उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले होते. तर परिवर्तन पॅनलचे 14 उमेदवार रिंगणात होते. शेतकरी विकास पॅनलचे 15 उमेदवारांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, माजी आमदार शरद गावित, नवापूर भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावित यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात आलेले परिवर्तन पॅनलचे 17 उमेदवार विजयी झाले आहे. मात्र, दुसरीकडे माजी मंत्री स्वरूपसिंग नाईक आणि त्यांचे पुत्र आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचा पराभव झाला आहे.
भरत दादा गावित काय म्हणाले –
परिवर्तन पॅनलचे सर्व 14 सीट निवडून आल्याने माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय माणिकराव दादा गावित यांना मतदारांनी खरी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे सर्व शेतकरी मतदार बंधूंचे आभार, असे भरत दादा गावित म्हणाले.