वॉशिंग्टन, 20 जानेवारी : मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये महिन्यात जगातील महासत्ता संबोधल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकालात रिपब्लिकन पक्षाचा विजय झाल्याने डोनाल्ड ट्रम्प हे चार वर्षांच्या कालवधीनंतर राष्ट्रध्यक्ष झाले. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे.
47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा घेतली शपथ –
डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दुसऱ्यांदा अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सोमवार रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता आणि भारतीय वेळेनुसार आज रात्री 10.30 वाजता अध्यक्षपदाची शपथ घेतली असून ट्रम्प यांचा शपथविधी युनायटेड स्टेट्स कॅपिटल रोटुंडा येथे पार पडला.
बायबलवर हात ठेवून राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ –
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेण्यासाठी मंचावर उभे राहिले. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा बायबलवर हात ठेवून राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आईने 1955 मध्ये एक बायबल दिलं होतं. त्यावर हात ठेवून ट्रम्प यांनी शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेताना फक्त 35 शब्दात ही शपथ घेतली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथेमध्ये केवळ 35 शब्द असतात.
जगभरातून 700 पाहुणे उपस्थित –
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “मी शपथ घेतो की मी युनायटेड स्टेट्सच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार निष्ठापूर्वक करीन आणि माझ्या क्षमतेनुसार, संविधानाचे जतन, संरक्षण आणि रक्षण करीन.” दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला जगभरातून 700 पाहुणे उपस्थित होते. भारतातून उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक उद्योगपती आणि मोठे नेते उपस्थित होते.
हेही वाचा : ‘..ही विजयश्री अविस्मरणीय, महाराष्ट्राला आपला गर्व’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस