आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. यानिमित्ताने संपूर्ण आंबेडकरी समाज आणि देश बाबासाहेबांना अभिवादन करीत आहे. हे करत असताना आंबेडकरी चळवळतील कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आज आंबेडकरी चळवळ क्षिण होताना दिसत आहे. चळवळ संपणार नाही, परंतु चळवळ आज ज्या पद्धतीने मजबूत असायला पाहिजे त्या पद्धतीने नाही. याची कारणे कार्यकर्ता, विचारवंत, नेते यांनी आत्मपरीक्षण करुन शोधणे फार आवश्यक आहे.
या ठिकाणी मी माझा अनुभव थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो, त्या घटनेमधून आपण चळवळीच्या निष्कर्षाकडे पाहू शकतो. मी एका कार्यकर्त्याशी बोलत असताना, त्यांनी सांगितलं की भाई तुम्ही पन्नास वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करतात आणि नेतृत्व करीत आहात. तुम्ही काय कमावलं? जर तुम्ही कमावलं असेल तर तुम्ही कार्यकर्त्याला काय दिलं, आणि कमावलं नसेल तर तुम्ही कार्यकर्त्यांना काय देऊ शकणार? म्हणजे तुम्ही आम्हाला काहीही देऊ शकणार नाही. मी तेव्हा सांगितले की, मी चळवळीमध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये पन्नास वर्षापासून काम करीत आहे, तर हे काम मी अत्यंत जाणीवपूर्वक आणि आणि आंबेडकरी विचार मजबूत करण्यासाठी करीत आहे. आणि जर मला कमाईच करायची असती तर महानगरपालिकेतील इंजिनियरची व्यवस्थित पगाराची नोकरी सोडून मी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून बाहेर आलोच नसतो. कारण मला नोकरी मधून घरदार चालवण्यासाठी आणि लेकरा बाळांचे पालन पोषण करण्यासाठी चांगला पगार मिळत होता. परंतु तो नाकारून मी बाहेर आलो, तो फक्त आणि फक्त चळवळीमध्ये नोकरीचे अडचण येऊ नये म्हणून! मी ती नोकरी सोडली आणि बाहेर आलो. याचाच अर्थ असा की कमाईचा मी कधीच विचार केला नाही. फक्त आंबेडकरी चळवळ मजबूत कशी होईल हा एकमेव उद्देश मी माझ्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे. म्हणून चळवळ हे कमाई करण्याचे साधन नाही, चळवळ हे ध्येय-धोरण, उद्दिष्ट आणि एकनिष्ठपणे समाजसेवा करण्याचं शस्त्र आहे. हे आम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे.
मात्र आजच्या काळात चळवळ हे कमाईचे साधन आहे. याचसाठी कार्यकर्ते चळवळीमध्ये काम करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय धोरण आणि बाबासाहेबांचे विचार यांची फारकत होते व चळवळीपासून, ध्येय-धोरणापासून आम्ही दूर जातोय. आमचं ध्येय फक्त पैसा कमावणे हेच झाल्यामुळे, आम्ही नफा-तोट्याचा, हार जीतीचा एक व्यवहारिक विचार करतो. आणि त्यामुळे ध्येयधोरण आणि व्यवहार याचं सूत्र आजपर्यंत कधी जमलंच नाही. म्हणूनच चळवळ गर्तेत अडकलेली आहे. डॉ. बाबासाहेबांच्या नंतर चळवळीला गतिमान करणे आणि शक्तिशाली बनवणे हे काम नेत्याचं, कार्यकर्त्यांचं आणि विचारवंताचं होतं. परंतु ते करू शकले नाही. परिणामी चळवळीला संथपणा आला. एक साचलेपण आलं आहे. चळवळ मंद झाली आहे. त्याचा फायदा जात्यांध शक्ती घेत आहे. त्यामुळेच आज समाजावर अन्याय अत्याचारांचा कळस झाला आहे. स्त्रियांची उघडी नागडी धिंड काढणे, तरुणांना नागडं करून बेदम मारहाण करणे, असे अनेक प्रकारे अत्याचार होत आहे. त्याला समर्थपणे आपण उत्तर देऊ शकत नाही, याचं कारण चळवळ शक्तिशाली नाही.
नेते आणि कार्यकर्ते व्यवहारात गुंतलेले आहे, त्यामुळे समाजाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. याचा विचार नेते, विचारवंत, साहित्यिकांनी आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी करणे आवश्यक आहे. येथे पुन्हा एकदा मी स्पष्टपणे सांगतो की चळवळ ही ध्येय धोरण राबवण्याचे साधन असून पैसा कमावण्याचा साधन नाही. चळवळ ही तुमचे विचार तुमची एकी आणि तुमची उद्दिष्ट साध्य करण्याचे एक शस्त्र आहे. ते बोथट होऊ देता कामा नये. मात्र ते बोथट होताना आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतोय.
डॉ. बाबासाहेबांनी दिलेले विचार आणि सांगितलेला मार्ग यापासून आपण कोसो दूर जात आहोत. याचे एक चांगलं उदाहरण म्हणजे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितले ‘शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा’ हा विचार आमच्यापासून कोसो दूर गेला आहे. आम्ही समाजामध्ये बाबासाहेबांचे हे विचार रुजवू शकलो नाही, कारण आम्ही व्यवहाराच्या पाठीमागे लागलो. पैसे कमवण्याच्या नशेमध्ये ध्येय धोरण विसरून गेलो. त्याचा परिणाम नेता एकीकडे, समाज दुसरीकडे आणि कार्यकर्ता तिसरीकडेच अशी आमची फारकत झालेली आहे.
प्रत्येक कार्यकर्ता चळवळी मधून मला काय मिळेल, पैसा कसा कमावता येईल, सत्ता कशी मिळेल, याचाच विचार करतो आणि त्या पद्धतीने तो वाटचाल करतो. त्यामुळे त्याला ना सत्ता, ना पैसा, काहीच मिळत नाही आणि शेवटी तो निराश होऊन चळवळीच्या बाहेर फेकला जातो. पर्यायाने त्याचे आणि चळवळीचे सुद्धा नुकसान होते. हे नुकसान जर टाळायचे असेल तर आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांची बांधिलकी, एकनिष्ठता, याची पक्की धारणा मनात ठेवून काम करावे लागेल. बाबासाहेबांचा विचार समाजात पोहोचवणे व त्या पद्धतीने कार्यकर्ता तयार करणे या गोष्टी आपण डॉ. बाबासाहेबांच्या जन्मदिनापासून सुरु केल्या तरच आपल्याला चळवळ पुन्हा एकदा शक्तिशाली आणि ध्येय धोरणाची पूर्तता करणारी निर्माण करता येईल. त्या दृष्टीने साहित्यिक विचारवंत कार्यकर्ते आणि नेते यांनी पुन्हा एकदा विचार करावा व आंबेडकरी चळवळ गतिमान करण्याचा निश्चय करावा हीच एक अपेक्षा.
लेखन
ॲड . रमेशभाई खंडागळे
(भारतीय दलित पँथर)