जळगाव : सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या, परंतु प्रवेश न मिळालेल्या किंवा प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेण्यात अडचण येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत इयत्ता अकरावी, बारावी तसेच इयत्ता दहावी आणि बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध महाविद्यालये व शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधांसाठी थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
सन 2024-25 या वर्षासाठी स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 मार्च 2025 असून, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.
योजनेचे निकष:
1. विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा.
2. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
3. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा.
4. विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा आणि त्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
5. पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपेक्षा अधिक नसावे (केंद्र शासनाच्या मॅट्रीककोत्तर शिष्यवृत्ती उत्पन्न मर्यादा वाढीप्रमाणे योजनेसाठीही वाढ लागू राहील).
6. विद्यार्थ्याचा आधार क्रमांक व राष्ट्रीयकृत/शेड्यूल्ड बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
7. विद्यार्थ्यासाठी पॅनकार्ड अनिवार्य आहे.
8. विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा – ज्या महाविद्यालयात / शिक्षण संस्थेत प्रवेश घेतलेला आहे, त्या परिसरातील महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत/कंटोन्मेंट बोर्ड येथे तो रहिवासी नसावा.
9. पदवी, पदविका अभ्यासक्रम किमान दोन वर्षांच्या कालावधीचा असावा व विद्यार्थीने मागील परीक्षेत किमान ५०% गुण किंवा समकक्ष ग्रेडेशन / CGPA मिळवले असावे.
10. योजनेसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
11. शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी योजनेसाठी पात्र राहील, मात्र शिक्षणातील खंड दोन वर्षांपेक्षा अधिक असू नये.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण:
विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड, जळगाव येथे 15 मार्च 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव योगेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.