नागपूर, 15 सप्टेंबर : एकलव्य इंडिया फाउंडेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजू केंद्रे यांना ‘इंटरनॅशनल अलम ऑफ द इयर’ हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार PIEoneers24 समारोह दरम्यान प्रदान करण्यात आला. राजू केंद्रे यांना हा पुरस्कार त्यांच्या उल्लेखनीय कारकिर्दीसाठी आणि एकलव्य इंडिया फाउंडेशनद्वारे केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रदान करण्यात आला. नुकतीच राजू केंद्रे यांची जर्मन सरकारच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा जर्मन चॅन्सलर फेलोशिपसाठी निवड करण्यात आली आहे.
शेतकरी पूत्र राजू केंद्रेंचा प्रवास –
राजू केंद्रे हे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील पिंप्री खंदारे या छोटयाश्या खेड्यातील भटक्या समाजातून येतात. राजु यांच्या आई वडिलांचे प्राथमिक शिक्षणही झालेले नाही. राजू यांच्या माध्यमातून कुटुंबातील पहिलीच पिढी उच्च शिक्षण घेणारी ठरली आहे. राजू यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात गेले पण आर्थिक आणि सामाजिक अडचणीमुळे अवघ्या काही महिन्यात राजू यांना पुणे सोडावं लागले.
त्यांच्या ह्या अनुभवातूनच त्यांना एकलव्य फाऊंडेशन सुरू करावे वाटले. याच दरम्यान, पुणे सोडल्यानंतर त्यांना महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथून पूर्ण करावं लागलं. यानतंर पुढे त्यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
ब्रिटिश सरकारची प्रतिष्ठित चेव्हेनिंग स्कॉलरशिपशी मिळवली –
2021 मध्ये राजू यांना जगातील प्रतिष्ठित अशी ब्रिटिश सरकारची मानाची चेव्हेनिंग स्कॉलरशिप मिळवली. या स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्यांनी मागच्याच वर्षी SOAS, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथून एमएससी इन डेव्हलपमेंट स्टडीजचे शिक्षण पूर्ण केले. लंडन येथील शिक्षणादरम्यान, त्यांनी उच्च शिक्षण आणि असमानता या विषयावर संशोधन केले आहे. .राजू यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्वीडिश इन्स्टिट्यूट व जर्मन डेव्हलपमेंट इन्स्टिटयूट येथील फेलो म्हणून पण निवडले होते. इतकेच नव्हे तर मागच्या वर्षी प्रतिष्ठित अशा ‘फोर्ब्स’ मासिकाने सुद्धा त्यांना 30 प्रतिष्ठित युवकांच्या यादीत समावेश केलं होते. यानंतर राजू केंद्रे यांची जर्मन सरकारच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा जर्मन चॅन्सलर फेलोशिपसाठी निवड करण्यात आली आहे. सध्या ते जर्मनीत असून जर्मनी व भारतातील उच्च शिक्षणाचा तुलनात्मक अभ्यास, उच्च शिक्षणातील असमानता व त्यावरचे धोरणात्मक बदल ह्या विषयात त्यांचे संशोधन कार्य करत आहेत.
काय म्हणाले राजू केंद्रे –
“2021-22 वर्ष माझ्यासाठी खास होते. SOAS युनिव्हर्सिटी ऑफ लंडन मध्ये शिकून आणि चेव्हनिंग शिष्यवृत्ती मिळवून माझ्या वैयक्तिक प्रवासासोबत आमच्या ‘एकलव्य इंडिया फाउंडेशन’च्या कामात मोठी भर पडली. अजूनही उच्च शिक्षणाच्या लोकशाहीकरणासाठी आणि वंचित समुदायांना नेतृत्वाची संधी निर्माण करण्यासाठी बरेचं काही करणे बाकी आहे. भारतातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे आणि ते निर्णय प्रक्रियेत धोरण कर्ते बनू शकतील यासाठी आम्ही प्रय्नशील आहोत. हा पुरस्कार आम्हाला या दिशेने अधिक प्रयत्न करण्यासाठी प्रेरित करेल. हा पुरस्कार मी पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना समर्पित करतो,” या शब्दात राजू केंद्रे यांनी सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
एकलव्य इंडिया फाऊंडेशनचे कार्य –
एकलव्य इंडिया फाउंडेशनने 2017 पासून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यावर आणि त्यांच्या करिअरची योजना आखण्यात मदत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी त्यांनी 700 हून अधिक कार्यशाळा आयोजित केल्या आणि 1700 हन अधिक विद्यार्थ्यांना देशातील आणि परदेशातील चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यात मदत केली. या संस्थेच्या 400 हून अधिक माजी विद्यार्थी आज यशस्वी करिअर करत आहेत आणि समाजासाठी काम करत आहेत. तसेच फाउंडेशनने अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यात मदत केली आहे. या शिष्यवृत्त्यांची किंमत 50 लाख अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त आहे. याशिवाय, फाउंडेशनने 30 हन अधिक विद्यार्थ्यांना जगातल्या प्रसिद्ध विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिल्या आहेत.
मागील गेल्या 7 वर्षांमध्ये, संस्थेने मार्गदर्शन आणि करिअर मार्गदर्शनासाठी 10 लाख तास समर्पित केले आहेत. आमच्या विद्यार्थ्यांना शासकीय कार्यक्रमांनी, ट्रस्ट्स आणि प्रतिष्ठित वैश्विक संस्थांनी 5 मिलियन अमेरिकन डॉलरहून अधिक शिष्यवृत्ती दिल्या आहेत, असे फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.
काय आहे PIEoneers अवॉर्ड्स –
PIEoneers अवॉर्डस हे आंतरराष्ट्रीय शिक्षण क्षेत्रातील एक विश्वासार्ह व्यासपीठ आहे, जे दैनिक बातम्या, विश्लेषण आणि बुद्धिमत्ताद्वारे व्यावसायिक, संस्था आणि व्यवसाय जोडतो. त्यांचा जागतिक कव्हरेज उच्च शिक्षण, ऑनलाइन शिक्षण, के-12 आणि विदेशाध्ययन यांचा विस्तार करतो. PIE च्या कार्यक्रमांमध्ये The PIE Live कॉन्फरन्स आणि The PIEoneer Awards यांचा समावेश आहे. हे कार्यक्रम समुदाय, ज्ञान सामायिक आणि नाविन्य निर्माण करतात. 2024 चा समारंभ लंडनच्या प्रसिद्ध गिल्डहॉलमध्ये पार पडला, ज्यात विचारवंत, निर्णयकर्ते आणि नवोन्मेषक यासह 530 प्रभावशाली उपस्थिती होती. एक प्रतिष्ठित निर्णायक मंडळाने विजेत्यांची विविध आणि निष्पक्ष निवडीवर शिक्कामोर्तब केले.