पाचोरा, 20 जानेवारी : पाचोरा तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक अभिजित नामदेव येवले यांचे निलंबन करण्याची मागणी एकलव्य संघटनेने केली आहे. यासंबंधीची तक्रार एकलव्य संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ यांनी केली आहे. तसेच निलंबन करण्यासंबंधीचे निवेदनही पाचोऱ्याचे तहसिलदार यांना देण्यात आले आहे.
काय आहे तक्रार
सुधाकर आत्माराम वाघ यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, दिनांक, 16 जानेवारी 2023 रोजी मी स्वत: माझ्या गावातील रेशनकार्ड दोन वर्षांपासून मिळवूनही धान्य मिळत नाही, याची चौकशीसाठी पुरवठा शाखेत गेलो असताना अभिजीत येवले यांना रेशन कार्ड किती दिवसांनी सुरू होईल, गेल्या दोन वर्षांपासून कार्यालयाचे चकरा माराव्या लागत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित रेशनकार्ड का सुरू करत नाही, असे विचारले असता त्यांना खूप राग आला आणि त्यांना रागाच्या भरात तावा तावाने रेशनकार्ड माझ्या अंगावर फेकून दिले.
तसेच मी तुमच्या बापाचा नोकर नाही आणि या कार्यालयातून निघून जा. मला कायदा शिकवू नका. तसेच त्यांनी अरेरावीची भाषा वापरली. तसेच त्यांनी शिवीगाळ करत मला बाहेर ढकलून दिले. त्यामुळे मी खाली पडलो. त्यामुळे माझ्यासोबत असलेले समाधान पाटील आणि जुम्मा पिंजारी यांनी मला उचलून बाहेर आणले.
गोर गरीब लोकांकडून एक रेशन कार्ड बनवून देण्यासाठी 1500 ते 2000 रुपयांची सर्रासपणे मागणी करतो. तसेच पैसे नाही दिले तर रेशनकार्ड होणार नाही. तसेच दोन दोन वर्ष रेशनकार्ड ऑनलाईन करणार नाही, अशी यांची कामाची पद्धत आहे. इतकेच नव्हे तर अंत्योदय यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी सेल्समनकडून 5 ते 10 हजार रुपये रुपये घेतले जातात.
त्यामुळे बेजबाबदार असलेल्या आपल्या पदाचा दुरुपयोग करणाऱ्या अभिजीत नामदेव येवले, यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी अर्जदार सुधाकर आत्माराम वाघ यांनी पाचोऱ्याचे तहसिलदार यांच्याकडे केली आहे.