अंतरावली सराटी (जालना) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली येथे गेल्या 17 दिवसांपासून मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी आज (14 सप्टेंबर) ज्यूस घेत आमरण उपोषण मागे घेतले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आमरण उपोषण मागे घेत असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी केली चर्चा –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जालन्यातील अंतरवाली येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणस्थळी भेट दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत 10 ते 15 मिनिटे चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आंदोलनस्थळी उपस्थितांना मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सरकारची भूमिकेबद्दल माहिती दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
सरकारला दिला वेळ –
मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपण उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. तसेच मराठा समाजाच्यावतीने मी सरकारला 1 महिन्याचा वेळ दिला आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कुणावर अन्याय न करता मराठा आरक्षण मिळवून देऊ. तसेच मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे, ही सरकारची ठाम भूमिका आहे. सरकारने गठीत केलेल्या समितीच्या माध्यमातून आरक्षण मिळण्यासाठी कायमस्वरूपी काम सुरू राहील, असेही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
सरकार ठामपणे उभे –
मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री जरी असलो तरी प्रोटोकॉल बाजूला ठेऊन मी मनोज जरांगे यांना भेटायचं ठरवलं होतं. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मी वेळोवेळी आदेश देऊन मनोज जरांगे यांच्या तब्यतेची काळजी घ्यायला लावत होतो. मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
काय म्हणाले मनोज जरांगे? –
उपोषणकर्ते मनोज जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार मी माझे उपोषण मागे घेत आहे. उपोषण सुरू केल्यापासून आतापर्यंत 17 लाखांपेक्षा जास्त लोकं मला भेटून गेली. त्या सर्वांची एकच मागणी होती सरकारला वेळ द्या पण आरक्षण घेतल्याशिवाय राहू नका. म्हणून मी सरकारला येथून 1 महिना किंवा त्यामध्ये अधिक 10 दिवसांची वाढ देतो, मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे जरांगे-पाटील यांनी सांगितले.
मी स्वस्थ बसणार नाही –
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझा लढा असाच सुरू राहील. मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवय मी स्वस्थ बसणार नाही, यासाठी मला माझा जीवही द्यावा लागला तरी चालेल. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी हटणार आणि शिंदे साहेबांनाही मी हटू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. लाठीचार्जमध्ये जखमी रूग्णांची भेट घेऊन व्यक्तीगत लक्ष देऊन त्यांच्या उपचाराची सोय करण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश –
मराठा आंदोलना दरम्यान गावकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना पोलीस अधिक्षकांना दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी दिलेल्या भेटी दरम्यान केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री संदीपान भुमरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जालन्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक उपस्थित होते.