शिवनेरी (जुन्नर), 19 फेब्रुवारी : किल्लेशिवनेरी येथे आज ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या जयघोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी बाळ शिवाजीसाठी खास पाळणा गायला.
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले ? –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. दरम्यान, शिवजयंती सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण काम करत आहोत. मराठा समाला आरक्षण देण्यासाठी उद्या आपण विशेष अधिवेशन बोलावले आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता इतर कुणाचेही नुकसान न करता मराठा समाजाला टिकणारे तसेच कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी उद्या हे खास अधिवेशन बोलावलेले आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पुरस्कारांनी सन्मानित –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘छत्रपती शिवाजी महाराज गौरव’ पुरस्काराने विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांना तर ‘शिवनेरी भूषण’ पुरस्काराने ब्रिगेडियर अनिल काकडे, डॉ. अरुण साबळे यांना सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचा सरकारला नवा इशारा; म्हणाले, ‘सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाहीतर…..’