कोलकाता : नुकताच देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. यामध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. मात्र, एनडीए या आघाडीला बहुमत मिळाले आहे. तर इंडिया आघाडीला बहुमतापासून दूर राहावे लागले आहे. या निवडणुकीच्या निकालात अनेक केंद्रीय मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तसेच अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनाही पराभव स्विकारावा लागला आहे. मात्र, यातच आता आणखी एका मतदारसंघाची चर्चा सर्वत्र होत आहे.
निवडणुकीत अनेकदा जवळचे नातेवाईक एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे तुम्ही पाहिले असेल. मात्र, या लोकसभा निवडणुकीत एका मतदारसंघात चक्क घटस्फोट घेतलेले पती-पत्नी एकमेकांविरोधात उभे राहिले होते. यामध्ये पतीचा निसटता विजय झाला आहे. पश्चिम बंगालमधील बिष्णुपूर याठिकाणी हा प्रकार पाहायला मिळाला. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये याठिकाणी भाजप उमेदवाराचा विजय झाला.
अटीतटीची झाली लढत –
पश्चिम बंगालमधील बिष्णुपूर या लोकसभा मतदारसंघात भाजपने सौमित्र खान यांना उमेदवारी दिली होती. तर त्यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेसकडून त्यांच्या पूर्व पत्नी सुजाता मंडल या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. याठिकाणी अत्यंत अटीतटीची ही लढत झालेली पाहायला मिळाली. परवा 4 जूनला निवडणुकीचा निकाल लागला आणि या निकालात सुजाला मंडल यांचे पूर्व पती आणि विरोधी उमेदवार भाजपचे सौमित्र खान निवडून आले. सौमित्र खान यांनी आपल्याच पूर्व पत्नीचा पराभव केला.
भाजपचे सौमित्र खान यांना 6 लाख 80 हजार 130 मते तर तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार सुजाता मंडल यांना 6 लाख 74 हजार 563 इतकी मते मिळाली. या निवडणुकीत सुजाता मंडल यांचे पूर्व पती हे फक्त साडेपाच हजार मतांनी निवडून आले. या मतदारसंघातील लढतीची सर्वत्र चर्चा होत आहे.
दरम्यान, पश्चिम बंगाल या राज्यात लोकसभेच्या एकूण 42 जागा होत्या. यामध्ये तृणमूल काँग्रेस या पक्षाने 29 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. तर या राज्यात भाजपला फक्त 12 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर याठिकाणी एक जागा काँग्रेस पक्षाने जिंकली आहे.






