जळगाव, 23 मे : खरीप हंगाम 2024-25 अंतर्गत केंद्र शासनाच्या आधारभूत किंमतीवर सुरू असलेल्या तूर खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, ही खरेदी आता 28 मे 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील 16 खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी सादर करता येणार आहे.
16 केंद्रांवर सुरू राहणार खरेदी प्रक्रिया –
नाफेडच्या माध्यमातून जिल्ह्यात अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, कासोदा, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव व चाळीसगाव येथे ही खरेदी सुरू आहे. आधारभूत किंमतप्रमाणे तूर खरेदीचा दर रु. 7550/- प्रति क्विंटल इतका निश्चित करण्यात आला आहे.
या मुदतवाढीचा शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, उपाध्यक्ष रोहित निकम, संचालक संजय पवार यांनी केले असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी एस. एस. मोने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराज स्व-समाधान शिबिरांतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप