मोयखेडा दिगर (जामनेर), 23 जानेवारी : जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील सरपंच पती समाधान मेढे यांनी विष प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. दरम्यान, या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले आहे. समाधान मेढे यांनी आत्महत्या केली नसून त्यांच्यासोबत मोठा घातपात झाला आहे. तसेच त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप, समाधान मेढे यांच्या पत्नी मोयखेडा दिगरच्या सरपंच कल्पना समाधान मेढे यांनी केला आहे.
काय आहे संपूर्ण बातमी?
मोयखेडा दिगर येथील सरपंच पती समाधान मेढे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (19 जानेवारी) रोजी घडली. ग्रामपंचायतीत सदस्यांनी तब्बल 9 लाख रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा संशय सरपंचपती समाधान मेढे यांना आला होता. याप्रकरणी समाधान मेढे यांनी गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांच्याकडे आर्थिक व्यवहार भ्रष्टाचार संदर्भात चौकशीसाठी तक्रार दाखल केली होती. दरम्यान, यानंतर ग्रामपंचायत सदस्यांनी मेढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव केला होता. याच कारणासाठी ग्रामपंचायत सदस्य शेख गफुर यांच्या शेतात बैठक असल्याचे सांगून समाधान मेढे यांना शेतात बोलावले होते.
लवकरात लवकर न्याय मिळावा –
समाधान मेढे यांनी शेतातून घरी येत त्यांच्या पत्नीला विष प्राशन केले असल्याचे सांगितले. दरम्यान, त्यांना तत्काळ जिल्हा रूग्णालायात दाखल करण्यात आले. शुक्रवारी (19 जानेवारी) रोजी उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या पत्नी कल्पना मेढे यांनी ग्रामपंचायत सदस्यांवर आरोप करत आपल्या पतीसोबत घातपात झाला असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
ऑल इंडिया पँथर सेनेचा आंदोलना इशारा –
ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी मयत सरपंच पती समाधान मेढे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की, सरपंच पती समाधान मेढे यांच्यासोबत घातपात झाला असून याप्रकरणी जामनेर पोलिसांत साधा गुन्हा देखील दाखल झाला नाही तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. म्हणून समाधान मेढे यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळावा, अन्यथा मोठ्या प्रमाणात आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, अशा इशारा दिपक केदार यांनी दिला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी होऊन आरोपींना अटक झाली पाहिजे तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केदार यांनी केली आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांचे काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन, वाचा सविस्तर